मुंबई : शिवशाहीच्या धडकेत ५० वर्षीय प्रवाशाला पाय गमवावा लागल्याची धक्कादायक घटना सोमवारी मुंबई सेंट्रल येथे घडली. या अपघातानंतर जखमी प्रवाशाला शिवशाहीकडून १ हजार रुपयांची मदत केली आहे. या प्रकरणी नागपाडा पोलिसांनी शिवशाहीच्या बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.रेनबो टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनीची ही शिवशाही आहे. एसटी महामंडळात या कंपनीच्या १०० शिवशाही राज्यातील विविध मार्गांवर धावत आहे. सोमवारी सकाळी ७च्या सुमारास शिवशाही (क्रमांक एमएच ०४ जेके २८४२)चा चालक जितेंद्र दादाभाऊ खौसे हा मुंबई सेंट्रल येथून वळण घेत होता. त्याच दरम्यान आत येण्याचा प्रयत्न करत असलेल्या इस्राईल अहमद मोहमद युसूफ शेख (५०) या प्रवाशाला बसची धडक बसली, ते खाली कोसळले. खौसे याने बस त्यांच्या पायावरून नेली. यामध्ये त्यांचा एक पाय जागीच निखळला.याप्रकरणी शेख यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. चालकाचा निष्काळजीपणा समोर आल्याने चालकाविरुद्ध नागपाडा पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.हजार रुपये देऊन केले हात वरअपघातात पाय गमावलेल्या शेख यांना शिवशाहीच्या कंपनीकडून फक्त १ हजार रुपये मदत देण्यात आली आहे.दोषीवर कारवाईमुंबई सेंट्रल येथील अपघात दुर्दैवी आहे. अपघातातील जखमी प्रवाशाला संपूर्ण आर्थिक मदत करण्यात येईल. शिवशाहीचे कागदपत्र आणि इन्शुरन्स पूर्ण असल्यामुळे, त्यानुसार जखमीला शक्य ती सर्व मदत करण्यात येईल. दोषी चालकावर त्वरित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.- रेनबो टुर्स अँड ट्रॅव्हल्स कंपनी.
शिवशाहीने दिलेल्या धडकेत प्रवाशाने गमावला पाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 1:49 AM