Join us

ऑनलाइन पडताळणीला प्रवाशांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:09 AM

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलमधून प्रवास करता येणार असल्याने मासिक पाससाठी आवश्यक कागदपत्र पडताळणीकरिता रेल्वे स्थानकांवर मागील ...

मुंबई : दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाच लोकलमधून प्रवास करता येणार असल्याने मासिक पाससाठी आवश्यक कागदपत्र पडताळणीकरिता रेल्वे स्थानकांवर मागील दोन दिवस गर्दी उसळत होती. मात्र गुरुवारपासून ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ऑनलाइन पडताळणी दोन मिनिटात होत असल्याने रेल्वे पास मिळवणे सहज शक्य होत आहे.

कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात आली आहे. यामुळे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना येत्या रविवारपासून लोकलने प्रवास करता येणार आहे. तत्पूर्वी रेल्वे पास देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या पडताळणीकरिता ऑफलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली; मात्र पुरावा सादर करणे, त्याची पडताळणी, मदत कक्षावर लोकांची गर्दी आदींमुळे गोंधळ उडत होता.

गुरुवारपासून राज्य सरकारने ऑनलाईन पडताळणी सुरू केली आहे. ही प्रक्रिया तत्काळ घरबसल्या होत असल्याने नागरिकांना रांगेत तिष्ठत राहावे लागत नाही. तसेच पडताळणी त्वरित होत आहे. त्यानंतर रेल्वेच्या तिकीट खिडकीवर जाऊन मासिक पास देणे सहज शक्य होत असल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मात्र प्रत्येकाकडे ऑनलाईन सेवा उपलब्ध असेलच असे नाही. अशा नागरिकांसाठी ऑफलाइन प्रक्रियाही सुरू राहणार असल्याचे, मुंबई पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.