प्रवासी सुरक्षा, भाडेवाढ, नवे प्रकल्प चर्चेत
By admin | Published: December 28, 2015 03:08 AM2015-12-28T03:08:36+5:302015-12-28T03:08:36+5:30
यंदाच्या २0१५ मध्ये रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, भाडेवाढ हे मुद्दे चांगलेच चर्चेत राहिले. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल डब्यात सीसीटिव्ही, तसेच लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी
यंदाच्या २0१५ मध्ये रेल्वे प्रवाशांची सुरक्षा, भाडेवाढ हे मुद्दे चांगलेच चर्चेत राहिले. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी लोकल डब्यात सीसीटिव्ही, तसेच लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजा बसवतानाच, प्रवास सुकर करण्यासाठी आसन व्यवस्थेतही बदल करण्यात आले. त्याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकल अपघातांच्या घटना घडल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रशासनाने गांभीर्याने विचार करण्यास सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्वच्छ भारत उपकर नावाने कर सुरू केल्यामुळे फर्स्ट क्लास प्रवाशांच्या खिशालाही कात्री लागली आणि प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. या महत्त्वाच्या मुद्द्यांबरोबरच काही नवीन प्रकल्पांना मंजुरी देतानाच, काहींचा मुहूर्तही साधण्यात आला. यामध्ये कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा शुभारंभ करण्यात आला, तर मुंबई-अहमदाबाद यासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी जपानसोबत करार केला गेला. मध्य रेल्वेने तर डीसी-एसी परावर्तन प्रकल्प मार्गी लावतानाच पश्चिम रेल्वेवर एमआरव्हीसीकडून बम्बार्डियर कंपनीच्या नव्या लोकल सुरू करण्यात आल्या.
दिवा स्थानकात आंदोलन
या वर्षी जानेवारी महिन्यात ठाकुर्लीजवळ लोकलच्या पेन्टोग्राफमध्ये तांत्रिक बिघाड होऊन लोकल उशिराने धावू लागल्याने, दिवा स्थानकात प्रवाशांकडून आंदोलन पुकारण्यात आले. त्यामुळे १५0 लोकल फेऱ्या रद्द झाल्या. दिवा स्थानकातील १ लाख १७ हजारांची कॅश लुटून १४ एटीव्हीएमची तोडफोड झाली. त्यानंतर दिवा स्थानकात जलद लोकल गाड्यांना थांबा देण्यासाठी नवीन प्लॅटफॉर्म बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला.
एमयूटीपी-३ मधील प्रकल्पांना मंजुरी
एमयूटीपी-३ मधील ११ हजार ४४१ कोटी रुपयांच्या सात प्रकल्पांना यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आल्यानंतर, आता यातील तीन प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला. यात विरार ते डहाणू तिसरा-चौथा मार्ग, ऐरोली-कळवा लिंक रोड आणि पनवेल-कर्जत दुहेरीकरण प्रकल्पाचा समावेश आहे.
सीव्हीएम कूपन बंद
१ एप्रिलपासून सीव्हीएम कूपन्सची तिकीट विक्री बंद करण्यात आली. २00३ साली मध्य रेल्वे आणि त्यानंतर पश्चिम रेल्वेवर यंत्रणा बसवल्यावर, त्या द्वारे ३0, ४0 आणि ५0, तसेच १00 रुपयांचे कूपन प्रवाशांसाठी उपलब्ध केले होते. मात्र, कूपनमधील गैरव्यवहार आणि ताळेबंद रोखता येत नसल्याने, सेवा बंद करण्यात आली.
महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा
आॅगस्ट महिन्यात चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमधील महिला डब्यात २२ वर्षीय तरुणीचा रात्री ११ च्या सुमारास ग्रॅन्ट रोड ते चर्नी रोड दरम्यान विनयभंग करण्यात आला. त्यानंतर याच महिन्यात डोंबिवली-सीएसटी जलद लोकलमध्ये गर्दुल्ल्याने महिला प्रवाशावर हल्ला केल्याचीही घटना घडली. या दोन्ही घटनांमुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला. त्यामुळे महिला प्रवाशांच्या डब्यात सीसीटिव्ही बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याची टप्प्याटप्यात अंमलबजावणी सुरुवात केली.
बम्बार्डियर लोकल सेवेत
नव्या बम्बार्डियर लोकलची चर्चगेट ते बोरीवली दरम्यान चाचणी घेण्यात आली आणि ही चाचणी यशस्वी ठरल्यानतंतर टप्प्याटप्याने लोकल पश्चिम रेल्वेवर दाखल होण्यास सुरुवात झाली. एमआरव्हीसीच्या एमयूटीपी-२ अंतर्गत जवळपास ७२ लोकलपैकी १0 लोकल दाखल झाल्या आहेत.
स्वयंचलित दरवाजा
गर्दीच्या वेळी लोकलमधून पडून होणारे अपघात रोखण्यासाठी मार्च महिन्यात स्वयंचलित दरवाजा लोकल आणण्यात आली. महिला प्रवाशांच्या फर्स्ट क्लास
डब्याला हा दरवाजा बसवून त्याचा प्रयोग करण्यात आला. मात्र, अनेक तांत्रिक कारणांमुळे हा प्रयोग फसला. त्यानंतर आता दुसऱ्या प्रयोगाला सुरुवात केली जाणार आहे.
लोकलची बफरला धडक
भार्इंदरहून आलेली लोकल चर्चगेट स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ३ वरील बफरला आदळल्याची घटना जून महिन्यात घडली. यात पाच प्रवासी जखमी झाले. त्यानंतर मध्य रेल्वेच्या सीएसटी स्थानकातही पाच नंबर प्लॅटफॉर्मवर लोकलने बफरला धडक दिल्याची घटना घडली.
लोकलचे डबे घसरले
सप्टेंबर महिन्यात लोकलचे डबे रुळावरून घसरण्याच्या दोन मोठ्या घटना घडल्या. हार्बर मार्गावर सीएसटी स्थानकात येणाऱ्या एका लोकलचा एक डबा घसरला आणि हार्बर सेवा विस्कळीत झाली. त्या पाठोपाठ पश्चिम रेल्वेवर अंधेरी ते विलेपार्ले दरम्यान जलद लोकलचे सात डबे रुळावरून घसरण्याची घटना घडली. या घटनेत सहा प्रवासी जखमी झाले, तर १३0 पेक्षा जास्त लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. २२ तासांनंतर पश्चिम रेल्वे रुळावर आली.
म.रे.वर डीसी-एसी परावर्तन पूर्ण
मध्य रेल्वेवर डीसी (१,५00 व्होल्ट अल्टरनेट करंट) ते एसी (२५,000 व्होल्टअल्टरनेट करंट) परावर्तनाचे काम सीएसटी ते ठाणेपर्यंत पूर्ण करण्यात आले. या परावर्तनामुळे लोकल गाड्यांचा वेग वाढण्यास मदत मिळणार असून, लोकल ताशी १00 किमी वेगाने धावू शकतील, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला.
प्रवास महागला : केंद्राकडून स्वच्छ भारत उपकर नावाने नवीन कर लादण्यात आल्याने, मुंबई उपनगरीय प्रवाशांना फर्स्ट क्लासच्या मासिक आणि त्रैमासिक पासासाठी जादा पैसे मोजावे लागले. दर शंभर रुपयांमागे ५0 पैसे या प्रमाणे पासात पाच रुपयांपासून वाढ झाली. त्यानंतर तत्काळच्या आरक्षण दरांमध्येही वाढ करण्यात आली. २५ डिसेंबरपासून नवे दर लागू करतानाच, २५ ते १00 रुपयांपर्यंत वाढ असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले.
आसनव्यवस्थेत बदल : भावेश नकातेचा लोकलमधून पडून मृत्यू झाला आणि गर्दीतला प्रवास सुकर करण्यासाठी व अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या संदर्भात समितीच्या शिफारशीनंतर रेल्वेतील आसनव्यवस्थेत बदल करण्यात
आला.
बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी भारत आणि जपानमध्ये करार करण्यात आला. जवळपास ९८ हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प सात वर्षांत पूर्ण केला जाईल. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान बुलेट ट्रेन धावणार असून, त्यामुळे तीन तासांत प्रवास शक्य होणार आहे.