Join us  

विमानात धुम्रपान करणाऱ्या प्रवाशाला अटक, लायटर, सिगारेट पाकिटही हस्तगत

By गौरी टेंबकर | Published: November 18, 2023 4:52 PM

स्मोक डिटेक्टरमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याठिकाणी असलेले ऑक्सिजनचे किटही खाली पडून त्याचे नुकसान झाले.

मुंबई:विमानाच्या स्वच्छतागृहात जाऊन धूम्रपान करणाऱ्या कबिर रिझवी (२७) नामक प्रवाशाला सहार पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार मस्कट ते मुंबई दरम्यानच्या प्रवासात घडला असून त्याच्याकडून लायटर आणि सिगारेटचे पाकीटही हस्तगत करण्यात आले आहे.

रिझवी हा मुळचा बंगळुरूचा राहणारा आहे. याप्रकरणी ओमान एअरलाइन्समध्ये सिक्युरिटी कॉर्डिनेटर या पदावर काम करणारे योगेश परब (५४) यांनी त्याच्या विरोधात सहार पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, सदर ओमान एअरलाइन्सच्या मस्कटवरून मुंबईला येणाऱ्या विमानाचे गुरुवारी सकाळी पावणे सातच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ याठिकाणी आगमन झाले. विमानाचे कॅप्टन यांनी कृमेंबर मोहम्मद अली बियाणी यांच्यामार्फत परब यांना लेखी कळवले की प्रवासी रिजवी हा सीट क्रमांक ३७ ठ वर बसला होता. जो प्रवासादरम्यान विमानाच्या टॉयलेटमध्ये धूम्रपान करताना आढळला. 

स्मोक डिटेक्टरमुळे हा प्रकार उघडकीस आला आणि त्याठिकाणी असलेले ऑक्सिजनचे किटही खाली पडून त्याचे नुकसान झाले. त्यामुळे रिझविला त्यांनी परब यांच्या ताब्यात दिले. सदर विमान मस्कटला जाणार असल्याने कॅप्टन आणि कृ मेंबर तिथून निघून गेले आणि त्यानंतर परब यांनी त्याला सहार पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यापूर्वी परब यांनी त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्यांनी धुम्रपान केल्याची कबुली दिली. त्यानंतर त्याच्याकडचे हिरव्या रंगाचे लाइटर आणि एकूण चार सिगरेट असलेले पाकीट हस्तगत करण्यात आले. त्याच्यावर सहार पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ३३६ आणि विमान अधिनियमचे कलम २५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :मुंबईगुन्हेगारीविमान