Join us

रेल्वेच्या वाढदिवशी प्रवासी रेल्वे बंद, आजच्या दिवशीच धावली होती पहिली रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 1:13 AM

रेल्वे प्रवासी संघटनेचा हिरमोड : १६ एप्रिल १८५३ रोजी धावली होती पहिली ट्रेन

कुलदीप घायवट 

मुंबई : रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच रेल्वेच्या वाढदिवसादिवशी देशातील सर्व प्रवासी रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनेचा हिरमोड झाला आहे. देशातील पहिली ट्रेन १६ एप्रिल १८५३ रोजी धावली. या घटनेला १६७ वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, कोरोनामुळे पहिल्यांदाच प्रवासी रेल्वे सेवा जास्त कालावधीसाठी बंद आहे.

देशात आणीबाणीची परिस्थिती, १९७४ सालचे रेल्वे कर्मचाऱ्यांचा संप, नैसर्गिक आपत्ती रेल्वे बंद झाली होती. मात्र कोरोना विषाणूमुळे रेल्वे सेवा जास्त कालावधीसाठी बंद असल्याचे पहिल्यांदाच झाले आहे. देशभरातील रेल्वे इतिहासात पहिल्यांदा १९७४ साली पूर्णपणे बंद झाली होती. जार्ज फर्नाडिस यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे बंदचा संप पुकारण्यात आला होता. २० दिवस तो संप होता. जागतिक महायुद्ध, मुंबईतील बॉम्ब स्फोट, अतिरेकी हल्ला याने देखील रेल्वे सेवा बंद झाली नव्हती. पावसामुळे काही तासांसाठी त्या ठिकाणची रेल्वे सेवा बंद झाली होती. मात्र देशातील प्रवासी रेल्वे सेवा पहिल्यांदा बंद झाली आहे, अशी माहिती प्रवासी संघटनेकडून देण्यात आली.रेल्वेच्या वाढदिवशी दरवर्षी रेल्वे गुणवंत कामगारांचा सत्कार केला जातो. केक कापला जातो. संपूर्ण प्रवाशांना या ऐतिहासिक दिवसाची आठवण राहण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. कोरोनामुळे पहिल्यांदाच रेल्वेचा वाढदिवस साजरा करता येणार नाही. कोणत्याही प्रवासी संघटनेकडून वाढदिवस साजरा केला जाणार नाही.- नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्था

टॅग्स :रेल्वेभारतकोरोना वायरस बातम्या