प्रवाशाचा विमानाचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न, गुन्हा दाखल
By मनीषा म्हात्रे | Published: June 2, 2024 08:48 PM2024-06-02T20:48:20+5:302024-06-02T20:48:29+5:30
कालिकत ते बहरीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली.
मुंबई: कालिकत ते बहरीन प्रवासादरम्यान एका प्रवाशाने विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. विमानातील कर्मचारी आणि प्रवाशांनाही शिवीगाळ करत गोंधळ घातल्याने विमानाने मार्ग बदलून मुंबईविमानतळावर लॅन्डींग केले. मुंबई विमानतळावर गोंधळ घालणारा प्रवाशी
अब्दुल मुसाविर नाडुकंडीईल (२५) याला सुरक्षा अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर, विमान बाहरीनला रवाना झाले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात अब्दुलविरुद्ध गुन्हा नोंदवत कारवाई करण्यात आली आहे.
एअर इंडिया एक्सप्रेस लिमीटेड या कंपनीमध्ये असोसिएट सिक्युरिटी म्हणून काम करत असलेले ओम रमेश देशमुख (२८) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. शनिवारी दुपारी १२.५२ दरम्यान कालिकत ते बाहरीनला निघालेले फ्लाईट मुंबईला वळविण्यात येणार असल्याचा संदेश येताच यंत्रणा अलर्ट झाल्या. चौकशीत, प्रवाशी अब्दुल मुसाविर नाडुकंडीईल (२५) याला सुरक्षा कंपनीकडे सोपवून केलेल्या तक्रारीनुसार, कालीकत ते बहरीन विमानाचे सकाळी १०.१० वाजता कालीकत विमानतळावरून उडडाण झाल्यानंतर १२ वाजताच्या सुमारास अब्दुलने सिटवरुन उठुन विमानाच्या मागच्या बाजूस असलेला दरवाजाजवळ गेला. तेथे कॅबीन क्रू ला धक्का मारून विमानाचा मागील दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्याला समजावून सीटवर बसण्यास सांगताच त्याने विमानात गोंधळ घातला. आजूबाजूच्या प्रवाशांनाही शिवीगाळ करत धक्काबुकी केली. तसेच पुन्हा दरवाजा उघडण्याची धमकी देऊ लागला. एकूणच अन्य प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विमानाच्या पायलटने विमानाचे मुंबई विमानतळावर लॅन्डींग केल्याचे सांगितले. पुढे, अब्दुलला सोडून विमान पुढे बहरीनला रवाना झाले.
अब्दुलचा पासपोर्ट तपासाला असता तो, मूळचा केरळचा रहिवाशी असल्याचे समोर आले. त्यानुसार, त्याच्याविरुद्ध सहार पोलिसांत तक्रार देत त्याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत त्याच्यावर कारवाई केली आहे. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक चौकशी सुरु आहे.