Join us

मुंबई विमानतळावर पुन्हा प्रवाशांचा खोळंबा; इमिग्रेशन काउंटर बंद, परदेशातून आलेल्यांचे हाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 6:47 AM

अनेक प्रवाशांनी आपल्याला झालेल्या त्रासाची व्यथा आणि संताप ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.

मुंबई : मुंबईविमानतळावर २५ हून जास्त इमिग्रेशन काउंटर असूनही त्यापैकी मोजकीच काउंटर सुरू असल्याचा फटका मंगळवारी रात्री उशिरा मुंबईत दाखल झालेल्या प्रवाशांना बसला. प्रवाशांना इमिग्रेशनमधून बाहेर पडण्यासाठी तीन ते चार तास लागले. अनेक प्रवाशांनी आपल्याला झालेल्या त्रासाची व्यथा आणि संताप ट्विटरद्वारे व्यक्त केला आहे.

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पहाटेदरम्यान १२ ते १४ विमाने दाखल होतात. परदेशातून अनेक तासांचा प्रवास करून आलेल्या या प्रवाशांना इमिग्रेशन काउंटरवर बायोमेट्रिक स्कॅनिंगसाठी थांबावे लागते. त्यानंतर त्यांना बाहेर सोडले जाते. मात्र, २५ पेक्षा जास्त इमिग्रेशन काउंटर असूनही काही मोजकेच काउंटर त्यावेळी सुरू होते. त्यातही काही काउंटरवरील स्कॅनरमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होत असल्याने बायोमेट्रिक स्कॅनिंगला वेळ जात असल्याचे एका प्रवाशाने सांगितले.

कमी काउंटर खुली असल्यामुळे एका काउंटरवर किमान १०० ते १२५ प्रवासी रांग लावून उभे होते. यामुळे प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअर करून बाहेर पडण्यास किमान तीन ते चार तासांचा कालावधी लागला. जितेंद्र पाध्ये नावाच्या एका प्रवाशाने सांगितले की, कमी काउंटर सुरू होते. त्यात एकापाठोपाठ एक विमाने दाखल होत असल्यामुळे गर्दी वाढतच होती. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा त्रास होत होता, तर जेव्हा एखाद्या प्रवाशाचे इमिग्रेशन क्लिअर होत होते त्यावेळी गर्दीतील काही लोक टाळ्या वाजवून त्याचे उपरोधिकपणे स्वागत करत असल्याचा एक व्हीडीओ न्यामर्ता अडवाणी या महिला प्रवाशाने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

टॅग्स :मुंबईविमानतळ