परतावा मिळण्यावरुन प्रवासी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 06:15 AM2019-04-19T06:15:40+5:302019-04-19T06:15:47+5:30

जेट एअरवेज बंद पडल्याने तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

Passengers are afraid of getting refunded | परतावा मिळण्यावरुन प्रवासी धास्तावले

परतावा मिळण्यावरुन प्रवासी धास्तावले

Next

मुंबई : जेट एअरवेज बंद पडल्याने तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. परतावा नेमका कसा मिळणार याबाबत त्यांच्यामध्ये अनिश्चितता आहे. तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना परतावा देण्यात येईल, अशी माहिती जेट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. प्रवाशांमध्ये याबाबत धास्तीचे वातावरण आहे. ज्या प्रवाशांनी ट्रॅव्हल एजंटच्या माध्यमातून तिकीट आरक्षित केले असेल त्यांनी पूर्ण परतावा मिळवण्यासाठी संबंधित ट्रॅव्हल एजंटशी संपर्क साधावा, असे आवाहन कंपनीने केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी सहजपणे हाताळता येईल अशी प्रक्रिया राबवण्यात येत असल्याची माहिती जेटने दिली. जेट एअरवेजच्या वेबसाइटवर परतावा मिळवण्यासाठी विशेष पान तयार करण्यात आले आहे. या पानावर याबाबत अधिक विस्तृत माहिती देण्यात आली आहे. त्यामध्ये दिलेल्या अर्जामध्ये माहिती भरल्यानंतर प्रवाशांना पूर्ण परतावा देण्यात येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
प्रत्यक्षात मुंबई विमानतळाच्या टर्मिनल २ वरील जेटच्या कार्यालयासमोर परतावा मिळवण्यासाठी अनेक प्रवाशांनी गर्दी केल्याचे चित्र गुरुवारी होते. दीपेश पटेल यांनी अमेरिकेत पर्यटनाला जाण्यासाठी २ मेची तीन तिकिटे फेब्रुवारी महिन्यात आरक्षित केली होती. त्या वेळी प्रति तिकीट ८० हजार प्रमाणे २ लाख ४० हजार रुपये त्यांनी भरले होते. मात्र प्रवासाला निघण्यापूर्वी १७ एप्रिलला जेटची सेवा पूर्णत: बंद करण्यात आल्याने त्यांना कंपनीने परतावा मिळण्यासाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याबाबत मेल केला होता. पटेल गुरुवारी विमानतळावर आले असता, त्यांना आवश्यक अर्ज भरण्यास सांगण्यात आले व १५ दिवसांनंतर परतावा मिळेल, असे आश्वासन देण्यात आले आहे. मात्र जेटची स्थिती पाहता प्रत्यक्षात कधी परतावा मिळणार याबाबत त्यांच्या मनामध्ये अनेक शंका उपस्थित झाल्या आहेत. अमेरिकेला जाण्यासाठी पर्यायी तिकीट मिळवण्यासाठी त्यांना प्रति तिकिटासाठी आता १ लाख ४० हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे त्यांनी आता अमेरिकेला जाण्याचा बेत रद्द केला आहे. मात्र तिकिटाचे पैसे कधी मिळतील याबाबत त्यांना धास्ती वाटत आहे.

Web Title: Passengers are afraid of getting refunded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.