वीर रेल्वे स्थानकात प्रवाशांचे हाल
By Admin | Published: May 11, 2017 01:47 AM2017-05-11T01:47:14+5:302017-05-11T01:47:14+5:30
ऐतिहासिक महाड तालुक्यातील कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानकामध्ये सुविधांची वानवा आहे. दिवसा उजेडी कोकण रेल्वेने
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : ऐतिहासिक महाड तालुक्यातील कोकण रेल्वेच्या वीर रेल्वे स्थानकामध्ये सुविधांची वानवा आहे. दिवसा उजेडी कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळत असल्या तरी रात्रीच्या वेळी वीर रेल्वे स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांचे सुविधांअभावी प्रचंड हाल होत आहेत. पुरेशी प्रकाशयोजना नसल्याने या ठिकाणी अपघातांना निमंत्रण दिले जात आहे. रेल्वे स्थानकात उतरलेल्या या प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी वाहतूक सुविधा नसल्याने अनेक प्रवाशांना रात्र स्थानकातच काढावी लागत आहे. या सुविधांकडे मात्र कोकण रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
महाड शहरापासून सुमारे १५ किमी अंतरावर कोकण रेल्वेचे वीर स्थानक आहे. या स्थानकात मध्यरात्री सावंतवाडी-मुंबई व पहाटेच्या वेळी मुंबई-सावंतवाडी राज्यराणी थांबते. तर रात्री ८ च्या सुमारास दादर- सावंतवाडी पॅसेंजर ही लोकल गाडी थांबते. स्थानकामध्ये लाइटची सुविधा असली तरी पुढे महामार्ग जोड रस्त्याला कोणतीच लाइटची सुविधा नसल्याने रात्रीच्या तीन गाड्यांनी प्रवास करणाऱ्या या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. कोक ण रेल्वेतील प्रवास करणारे हे प्रवासी या स्थानकात उतरल्यानंतर गावी जाण्यासाठी काहीच सुविधा नसल्याने महामार्गावर येवून गाड्यांची वाट पहावी लागते. मुळातच रस्ता अरुंद, प्रवासी आणि सामानांची गर्दी यामुळे स्थानकाबाहेरील महामार्ग अपघात स्थळ बनले आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वच वयोगटातील प्रवासी रात्री रेल्वे स्थानकाबाहेर गाड्यांना हात दाखवताना दिसतात. रात्रीचा प्रवास असल्याने खाजगी अगर एसटी महामंडळाची बस या ठिकाणी थांबत नाही. वेळोवेळी मागणी करून देखील रेल्वे प्रशासन लाइटच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे.
२० मार्च रोजी अशाच प्रकारे मध्यरात्रीच्या वेळी रस्ता ओलांडत असताना एका वृद्ध महिलेला अपघात झाल्याची घटना घडली. तसेच रात्री या स्थानकाबाहेर अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र त्याची नोंद नाही.
यासंदर्भात वीर रेल्वे प्रशासनाकडे संपर्क साधला असता वीर रेल्वे स्थानकातून सेक्शन इंजिनिअर विभागीय अभियंता इलेक्ट्रीक कोकण रेल्वे चिपळूण यांच्याकडे या प्रकरणी अनेकवेळा या ठिकाणी होणाऱ्या विजेच्या गैरसोईबद्दल माहिती देण्यात आली. मात्र या गैरसुविधेकडे चिपळूण कार्यालयाकडून लक्ष देत नसल्याची माहिती या स्थानकातून मिळाली आहे.