रेल्वेच्या कॅशलेस सेवेकडे प्रवाशांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:05 AM2021-09-19T04:05:38+5:302021-09-19T04:05:38+5:30
मुंबई : लॉकडाऊनपूर्वी लोकलचे तिकीट, मासिक पास काढताना कॅशलेस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांनी कॅशलेस ...
मुंबई : लॉकडाऊनपूर्वी लोकलचे तिकीट, मासिक पास काढताना कॅशलेस सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, कोरोनामुळे प्रवाशांनी कॅशलेस सेवेकडे पाठ फिरवली असून मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या कॅशलेस सेवेच्या प्रतिसादात घट झाल्याचे दिसून आले आहे.
काेराेनामुळे सामान्य मुंबईकरांच्या लाेकल प्रवासावर आलेले निर्बंध, प्रवासी संख्येत झालेली घट, इतकेच नव्हे तर कोरोनाचा फटका कॅशलेस सेवेलाही बसला आहे. २०२०-२१ मध्ये कॅशलेस सेवेद्वारे मध्य रेल्वेवर फक्त ७८ मासिक पास, तिकीट काढण्यात आले. तर दुसरीकडे पश्चिम रेल्वेवर तब्बल २३ हजार मासिक पास, तिकीट कॅशलेसच्या माध्यमातून काढली आहेत.
नाेटांबदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्यात आले. त्यानुसार उपनगरीय रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या साेयीसाठी रेल्वे प्रशासनाने तिकीट खिडक्यांवर पीओएस यंत्र (पॉइंट ऑन सेल) बसविले. या पीओएस यंत्रावरून प्रवासी डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तिकीट, मासिक पास घेऊ शकतात. पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकात पहिले पीओएस यंत्र बसविले हाेते. त्यानंतर सर्वच रेल्वे स्थानकांत पीओएस यंत्रे ठेवण्यात आली. पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर ३१२ तर, मध्य रेल्वेवर ४०९ पीओएस यंत्रे आहेत. पश्चिम रेल्वेवर २०१९-२० मध्ये पीओएस यंत्राद्वारे डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चार लाख ४६ हजार ८७९ मासिक पास आणि चार हजार ८९८ तिकीट काढले होते. २०२०-२१ मध्ये काेराेनामुळे २३ हजार २४३ मासिक पास आणि ५९८ तिकिटे काढण्यात आली. त्यात २०२१-२२ मध्ये आणखी कमी होऊन १२ हजार ९८५ पास आणि १८४ तिकिटांची विक्री झाली. मध्य रेल्वेवर २०१९-२० मध्ये दोन हजार ४७१ मासिक पास आणि तिकीट, २०२०-२१ मध्ये ७८ मासिक पास आणि तिकिटे काढली.
पीओएस यंत्रातून काढलेल्या पास, तिकीट
वर्ष पश्चिम रेल्वे मध्य रेल्वे
२०१९-२० ४ लाख ५१ हजार ७७७ -२ हजार ४७१
२०२०-२१ २३ हजार ८४१ - ७८