Join us

बस, रेल्वेमधील प्रवासी सुधारेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना नियंत्रणात येत असताना आता पुन्हा बस आणि रेल्वेमध्ये प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना नियंत्रणात येत असताना आता पुन्हा बस आणि रेल्वेमध्ये प्रवाशांकडून नियमांचे उल्लंघन होत आहे. सप्टेंबरपासून पुन्हा रेल्वे प्रवासी संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे आता रेल्वे प्रवासात चौथ्या सीटवरून वाद होत आहेत. प्रवासावेळी अनेकजण एकमेकांशी बोलताना मास्क हनुवटीवर आणून बोलत आहेत. त्यामुळे पुन्हा कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याची दाट शक्यता आहे.

कोरोनाकाळात रेल्वेस्थानकांवर मास्क परिधान न करणाऱ्या प्रवाशांवर कारवाईसाठी महापालिकेने मार्शल नेमले आहेत. तसेच रेल्वेच्या विशेष तिकीट तपासणीस पथकालाही विनामास्क प्रवाशांवर कारवाईची मुभा देण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांकडून लाखो रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला होता. मात्र, तरीही प्रवाशांमध्ये सुधारणा होताना दिसत नाही.

मध्य रेल्वेकडून १७ एप्रिल ते १८ सप्टेंबर या काळात विनामास्क प्रवास करणाऱ्या २१९३ प्रवाशांवर कारवाई करत ४ लाख २९ हजार २४५ इतकी रक्कम वसूल करण्यात आली. यामध्ये महापालिकेने केलेल्या कारवाईचा समावेश नाही. प्रवाशांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी एसटी महामंडळाने बसला कोटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विभागातील १८५हून अधिक बसेस ॲन्टिमायक्रोबियल कोटिंग केल्या आहेत. त्यामुळे या बस कोरोना फ्री झाल्या आहेत. मात्र, तरीही बसमधील बहुतांश प्रवासी प्रशासकीय सूचनांचे उल्लंघन करत बेफिकीरपणे प्रवास करत आहेत.

चौकट

लाखाेंची वसुली

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि लसीचे दोन डोस आणि १४ दिवस पूर्ण झालेल्यांना १५ ऑगस्टपासून रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. २१ एप्रिल ते १८ सप्टेंबरदरम्यान ४८९१ प्रवाशांनी नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यांच्याकडून २४ लाख ४७ हजार २३५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर पश्चिम रेल्वेने १ एप्रिल ते २५ सप्टेंबरपर्यंत विनामास्क प्रवास करणाऱ्या १०,८७२ प्रवाशांवर कारवाई करत १६ लाख ५५ हजार १०० इतकी रक्कम वसूल केली आहे.