मुंबई: कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यानंतर राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले होते. राज्यातील रुग्णसंख्या सध्या जरी नियंत्रणात असली तरी संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन अजूनही राज्य सरकार निर्बंधांबाबत सावध पावलं उचलत आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी अद्याप लोकल सुरू नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. आणखी किती दिवस हाल सहन करायचे असा सवाल प्रवासी विचारत आहेत.
उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे (महासंघ) अध्यक्ष नंदकुमार देशमुख म्हणाले की, सर्वसामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची मुभा लवकरात लवकर द्या. कोरोनाचे दोन लसीचे डोस घेतलेल्यांना प्राधान्याने लोकल प्रवास करण्याची परवानगी द्यावी, ही मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. लोकल प्रवास बंदीमुळे, अनेकांच्या चुली पेटणे बंद झाले आहे.
मागील तीन महिन्यांपासून लोकल सेवा बंद असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रोजगाराची चिंता, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, आरोग्य खर्च, घरातील दैनंदिन खर्च आणि त्यात वाढलेला प्रवासी खर्च हे सर्व सांभाळताना सर्वसामान्यांची तारेवरची कसरत होत आहे. पेट्रोलने शंभरी गाठल्याने खासगी वाहने वापरणे गैरसोयीचे झाले आहे. लोकल प्रवास खुला करण्याची मागणी होत आहे.
तीन महिन्याहून अधिक काळ केवळ अत्यावश्यक सेवेसाठी सुरु आहे. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत त्यांचा खासगी वाहनांमुळे खर्च वाढला आहे. आणखी किती दिवस हाल सहन करायचे. दोन डोस घेतलेल्या नागरिकांसाठी तत्काळ लोकल सुरू करावी- सुरेश जाधव, प्रवासी
कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर लोकल बंद करण्यात आली होती; मात्र आता रुग्णसंख्येत घट झाली आहे,त्यामुळे सरकारने तत्काळ लोकल सेवा सुरू करावी.- रत्नाकर सावंत, प्रवासी
लोकलसेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. लोकल प्रवासावरच त्यांचे जीवन अवलंबून आहे. त्यांच्या नोकरी आणि व्यवसायावर परिणाम होत आहे, लोकल सुरू केल्यास त्यांना दिलासा मिळेल.- सुमित घाटे,प्रवासी