मुंबईतील प्रवाशांकडे नाही दोन हजारांची नोट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2023 06:22 PM2023-09-13T18:22:30+5:302023-09-13T18:23:00+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांबाबत अधिसूचना जारी करून २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने २००० रुपयांच्या चलनात असलेल्या नोटांबाबत अधिसूचना जारी करून २९ सप्टेंबरच्या मध्यरात्री १२ नंतर तत्काळ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २९ सप्टेंबरपासून एसटीमध्ये २००० ची नोट चालणार नाही. याबाबतच्या सूचना एसटी महामंडळाकडून देण्यात आल्या आहेत. मात्र ५ सप्टेंबरपासून ११ सप्टेंबरपर्यंत मुंबई विभागात एकही दोन हजारांची नोट मिळालेली नाही, अशी माहितीही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
काय आहे एसटी महामंडळाचे पत्रक?
२००० रुपयांच्या नोटा २९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच वैध असतील, अशी रिझर्व्ह बँकेची सूचना आहे. त्यामुळे महामंडळाकडे जमा होणाऱ्या २००० च्या चलनी नोटा ३० सप्टेंबर रोजी किंवा त्यापूर्वी बँकेत जमा होणे अत्यंत आवश्यक आहे.
अन्यथा ३० सप्टेंबरनंतर अशा नोटांचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याकरिता बुधवार २८ सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंतच २०००च्या नोटा स्वीकारण्यात याव्यात.
२९ सप्टेंबरपासून एसटीत २००० ची नोट चालणार नाही
२८ सप्टेंबरपर्यंत संकलन झालेल्या २००० च्या नोटा लगेच दुसऱ्या दिवशी २९ सप्टेंबरपर्यंत त्या आगारातील संबंधित बँक खात्यात जमा कराव्या लागणार आहेत.
महामंडळाचा इशारा
२९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर कोणत्याही परिस्थितीत २००० च्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत, याची नोंद घेण्यात येणार आहे. २९ सप्टेंबरच्या मध्यरात्रीनंतर २००० च्या नोटा स्वीकारल्यास व त्यांचा बँक भरणा करण्याचे राहिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभागाची राहील, असा इशारा एसटी महामंडळाने प्रशासनाला दिला आहे.
दोन हजारांच्या नोटा २८ सप्टेंबरपर्यंत एसटीत चालणार आहेत; परंतु काही महिन्यांपासून प्रवाशांकडून दोन हजारांची नोट मिळत नाही. प्रवाशांकडे ५०० रुपयांच्या नोटा आहेत.
- एक वाहक