मुंबई - मुंबईहून दुबईला जाणाऱ्या स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने तब्बल १५ तास उशिराने उड्डाण केल्यामुळे या विमानातील प्रवाशांचे अक्षरश: लोकल खोळंबल्याप्रमाणे हाल झाले. धक्कादायक गोष्ट म्हणजे, अनेक प्रवाशांनी आपले सामान परत द्या, आम्ही दुसऱ्या विमानाने जातो, असे सांगूनही कंपनीने त्यांना सामान परत केले नाही. तसेच, विमानाला इतका विलंब नेमका कशामुळे झाला, याचे ठोस कारणही शेवटपर्यंत सांगण्यात आले नाही.
या विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवासी शिल्पा कुलकर्णी-मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले की, या विमानाच्या उड्डाणाची वेळ सोमवारी पहाटे २ वाजता होती. त्यानुसार आम्ही रविवारी रात्री ११ वाजता मुंबई विमानतळावर पोहोचलो. आमच्या सामानाचे चेक-इन केले. आम्ही विमानात देखील बसलो. मात्र, दोन तासानंतर आम्हाला विमानातून उतरवून पुन्हा काऊंटरवर आणण्यात आले. तिथे असलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी विमान लवकरच उड्डाण करेल, असे आम्हाला सांगितले. मात्र, त्यानंतर सकाळ उजाडली तरी काहीच हालचाल झाली नाही. ‘आमचे सामान परत द्या, आम्ही दुसऱ्या विमानाने जातो’, असे सांगूनही त्या कर्चमाऱ्यांनी आम्हाला दाद दिली नाही.
ना जेवण, ना झोप, मीटिंगही झाल्या रद्द!अशा परिस्थितीमध्ये कंपनीने प्रवाशांच्या निवासाची व्यवस्था करणे अपेक्षित होते. पण, तशी कोणतीही सोय करण्यात आली नाही. प्रवाशांना केवळ एका छोट्या स्टॉलवरून काही खाद्यपदार्थ पुरवण्यात आले. अखेर १५ तासांनंतर या विमानाने उड्डाण केले. मात्र, या काळात प्रवाशांची झोपही झाली नाही. त्यामुळे अनेकांना दुबईतील सकाळच्या मीटिंग वा पुढील प्रवासाचे नियोजन रद्द करावे लागल्याचे सांगण्यात आले.