साध्या लोकलमधील प्रवाशांचा ‘एसी’तून प्रवास, दंड ठाेठावल्याने संताप; बदलापूरमध्ये स्टेशन मास्तरांना घेराव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2022 06:49 AM2022-08-25T06:49:52+5:302022-08-25T06:50:12+5:30
सलग तिसऱ्या दिवशी एसी लोकलविरोधात बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
बदलापूर :
सलग तिसऱ्या दिवशी एसी लोकलविरोधात बदलापुरातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला. बुधवारी पुन्हा मुंबईहून बदलापूरमध्ये खोपोली लाेकलमधून उतरलेल्या संतप्त प्रवाशांनी रेल्वे स्टेशन मास्तरांना घेराव घातला. काही प्रवाशांनी एसी लोकलने प्रवास करून सविनय कायदेभंग आंदोलन केले. या प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्याने त्यांचा संताप आणखीनच अनावर झाला.
गेल्या आठवड्यापासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ५.२२ मिनिटांनी सुटणारी सर्वसामान्य लोकल रद्द करून त्याऐवजी एसी लोकल सुरू केली होती. मुंबईहून बदलापूरच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांना त्याच कालावधीत बदलापूरची दुसरी लोकल नसल्याने ५.३३ ची खोपोली लाेकल पकडावी लागत होती. या लाेकलला प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांनी ५.२२ ची एसी लोकल रद्द करून त्याऐवजी पूर्वीप्रमाणे सर्वसाधारण लोकल सुरू करण्याची मागणी केली होती. रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने सलग तीन दिवस खोपोली लाेकलमधून उतरलेल्या बदलापूरकरांनी स्टेशनमास्तरांना घेराव घालून संताप व्यक्त केला.
दोन दिवसांपासून प्रवाशांना ‘गाजर’
दोन दिवसांपासून रेल्वे प्रशासन या प्रवाशांना आश्वासनाचे गाजर दाखवून माघारी पाठवत होते. बुधवारी पुन्हा ५.२२ ला एसी लोकलच लावल्याने काही प्रवाशांनी सविनय कायदेभंग आंदोलन करून या लोकलमधून प्रवास केला. त्यातील काही प्रवाशांवर दंडात्मक कारवाई केल्याने त्यांनी स्टेशनमास्तरांसमाेर रोष व्यक्त केला. या लोकलपाठोपाठ खोपोली लोकल येताच त्यातून उतरलेल्या बदलापूरच्या प्रवाशांनी पुन्हा स्टेशनमास्टरांचे कार्यालय गाठत गोंधळ घातला.
पाेलीस बंदाेबस्त मागविला
महिलांची गर्दी जास्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता. रेल्वे प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केल्यानंतर रेल्वे प्रशासनाने नमते घेत गुरुवारपासून एसी लोकल धावणार नाही, असे ठाेस आश्वासन दिले. एसी लोकल रद्द करण्याबाबत बुधवारी दुपारी निर्णय झाल्याची माहिती स्टेशनमास्तरांनी प्रवाशांना दिल्यावर प्रवाशांनी आपले आंदोलन मागे घेतले.