मुंबई : यंदाच्या दिवाळीत सर्वसामान्यांची लालपरी सुसाट चालली. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक योजना आणि अमृत योजना यामुळे एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला; परंतु दिवाळीनंतर डिसेंबरमध्ये एसटी पुन्हा एकदा तोट्याच्या वाटेवर आली आहे. मुंबई विभागात लाखभर प्रवासी वाढले; पण उत्पन्नात ५० लाखांची घट झाली आहे.दिवाळीत सर्वजण गावी जातात. डिसेंबर महिन्यात लांब पल्ल्याचे भाडे कमी होते तसेच एसटीने हंगामी भाडेवाढ केली होती. सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्यात आली. ती भाडेवाढ डिसेंबरमध्ये रद्द करण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा एसटीच्या उत्पन्नात घट झाली आहे.एकीकडे २० वर्षांत पहिल्यांदा एसटी फायद्यात आली होती; परंतु दिवाळी भेटमुळे गणित बिघडले. डिसेंबरमध्ये १. २० लाख प्रवासी वाढूनही एसटीच्या मुंबई विभागाला ५० लाखांचा तोटा आला आहे.
दिवाळीत प्रवाशांची संख्या वाढणार हे गृहीत धरून एसटी महामंडळाने काही दिवस अगोदरच नियोजन केले होते. १८.१३ लाख प्रवाशांनी मुंबई विभागात नोव्हेंबरमध्ये प्रवास केला होता त्यातून १९. ४४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्यामुळे प्रवाशांनी लालपरीलाच पसंती दिली. या उत्पन्नवाढीत एसटीकडून महिला प्रवासी, ज्येष्ठ नागरिक, अमृतमहोत्सवी ज्येष्ठांना प्रवासात सवलत दिल्यानंतर प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली. विशेषतः महिला प्रवाशांचे प्रमाण जास्त होते.
एसटी महामंडळाने सवलत दिल्याने प्रवासी संख्येत वाढ झाली आहे; पण गाड्यांची अवस्था खराब आहे. त्यामध्ये सवलत धारक प्रवासी जास्त असतात. इतर प्रवाशांचा ओढा कमी आहे. त्या वर्गाला आकर्षित करण्यासाठी नवीन गाड्या घेण्याची गरज आहे. - श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस