Join us

प्रवाशांना संपाचा जाच कायम; आर्थिक भुर्दंडाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 2:11 AM

पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रवाशांचे हाल कायम होते. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध होत नव्हत्या.

मुंबई : बेस्टचा संप चौथ्या दिवशीही सुरू राहिल्याने मुंबईकरांचे हाल झाले. रिक्षा, टॅक्सीसह मेट्रो आणि लोकलवर गर्दीचा ताण वाढतच राहिल्याने प्रवाशांना इच्छित स्थळ गाठण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली. महत्त्वाचे म्हणजे रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडून प्रवासासाठी जादा पैसे आकारण्यात आल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागला.

पूर्व आणि पश्चिम उपनगरात प्रवाशांचे हाल कायम होते. सकाळी आणि सायंकाळी प्रवाशांना इच्छित स्थळी जाण्यासाठी रिक्षा आणि टॅक्सी उपलब्ध होत नव्हत्या. शेअर रिक्षा चालकांकडून जादा पैसे आकारण्यात येत होते. मेट्रोवर प्रवाशांचा अतिरिक्त ताण पडला होता. महत्त्वाचे म्हणजे वाहतूककोंडी यात आणखी भर घालत असल्याने प्रवाशांचा मनस्ताप वाढतच होता. विशेषत: एलबीएस मार्गावर कमानी, कुर्ला डेपो तर कुर्ला ते अंधेरी मार्गावर साकीनाका, जरीमरी आणि मरोळ येथे प्रवाशांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. घाटकोपर असल्फा मार्गावरही काही प्रमाणात कोंडी झाली होती. कोंडी आणि संप अशा दुहेरी कात्रीत प्रवासी सापडले होते.

बेस्ट संपामुळे अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करीत असून तिकिटासाठी अंधेरी रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्या. अंधेरी रेल्वे पादचारी पुलावरील मेट्रोकडे जाणारी तिकीट खिडकी बंद करून येथे फक्त स्मार्ट कार्ड तिकीट स्वाईप यंत्रणा पश्चिम रेल्वेने कार्यान्वित केली आहे. बेस्ट संपामुळे रेल्वे प्रवाशांच्या संख्येत झालेली वाढ लक्षात घेत प्रवाशांच्या सुविधेसाठी पश्चिम रेल्वेने त्यांच्या बंद असलेल्या तिकीट खिडक्या उघडाव्यात. तिकीट मशीनवर तिकीट देण्यासाठी जादा कर्मचारी तैनात करावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली.बेस्टचा संप चार दिवस सुरू आहे. शुक्रवारी दुपारी गोरेगाव व ओशिवरा डेपोतील बेस्टच्या दोनशे संपकऱ्यांना शिवसेना गोरेगाव विधानसभा संघटक दिलीप शिंदे व संपकरी कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने भोजनवाटप करण्यात आले.चौथ्या दिवशीही प्रवासी संतप्तपश्चिम उपनगरात बेस्ट संपाच्या चौथ्या दिवशीही प्रवासी संतप्त होते़ चौथ्या दिवशीही प्रवाशांचे हाल झाल्याचे चित्र दिसून आले. सकाळच्या वेळेस विविध ठिकाणांहून रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रिक्षाच्या थांब्यावर प्रवाशांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. बेस्टचा संप कर्मचाºयांनी लवकरच मागे घ्यावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. पश्चिम उपनगरात बेस्टच्या संपाचा फायदा घेत रिक्षाचालक प्रवाशांकडून अव्वाच्या सव्वा भाडे वसूल करत होते. प्रवाशांनाही दुसरा पर्याय नसल्याने रिक्षाचालकांची अरेरावी सहन करावी लागली. तसेच काही रिक्षाचालक मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी वाहनात बसवत होते. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून प्रवाशांना सुखकर प्रवासाला मुकावे लागत आहे. 

टॅग्स :बेस्ट