मनोहर कुंभेजकर
मुंबई : परदेशातून मुंबईतविमानतळावर उतरल्यास आता कोणालाही क्वारंटाईन करण्यात येणार नाही. मात्र त्यांची ६०० रुपये देऊन कोविड तपासणी करून त्या प्रवाश्यांना घरी जाऊ देण्यात येणार आहे. तर मिडल ईस्ट, युरोप आणि दक्षिण आफ्रिका येथून आलेल्या प्रवाश्याकडे आरटीपीसीआर प्रमाणपत्र असल्यास त्यांनाही घरी सोडण्यात यावे. केवळ त्यांच्या तपासणीचा अहवाल जर पॉझिटीव्ह आल्यास त्यांना होम क्वारंटाईन करण्यास सांगण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.
त्यामुळे पंचतारांकित हॉटेल मध्ये १४ दिवस सक्तीचे क्वारंटाईन केल्यानंतर प्रवाशांना पडणारा आर्थिक भार सहन करावा लागणार नाही किंवा अन्य कोणत्याही मार्गाद्वारे यातून बाहेर पडण्याची गरज भासणाा नाही किंवा विमानतळावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांना क्वारंटाईन व्हायचे नसल्यास भ्रष्ट मार्गाने १० हजार रुपये देण्याचीही गरज आता भासणार नाही. या संदर्भात लोकमत ऑनलाइन अणि लोकमतमध्ये वृत्त प्रसिद्ध झाले....अन् पहाटे ५ वाजता खासदारांना फोन केला; प्रवाशांच्या सुटकेसाठी तातडीनं मदतीला धावले
खासदार गोपाळ शेट्टी यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला होता. रविवारी मध्यरात्री दक्षिण आफ्रिकेतून २ वाजता आलेल्या शिगवण या मुलाला १४ दिवस हॉटेल मध्ये क्वारंटाईन होण्यास सांगण्यात आले. पण त्याने खर्च परवडणार नसल्याने नकार दिल्याने १० हजार रुपये दे व मग घरी जाण्यास सांगितले. दरम्यान पहाटे तिथे पोहचलेल्या खासदार गोपाळ शेट्टी यांनी केंद्र सरकारने काढलेल्या परिपत्रकाचा हवाला दिल्यानंतर त्या मुलाला सोडण्यात आले. विमानतळावर जो अनुभव आला तो लोकांना नाहक त्रास देणारा असल्याने खासदार गोपाळ शेट्टी यांनी भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, नगरसेवक विनोद मिश्रा, कमलेश यादव, माजी नगरसेवक ज्ञानमूर्ती शर्मा यांच्यासह पालिका मुख्यालयात अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासु यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले व चर्चा केली. तेव्हा पी. वेलरासु यांनी परदेशातून येऊन मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची होणारी आर्थिक लूट हा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन थांबवली आहे.
तो खर्च परत घ्यावा...खासदार गोपाळ शेट्टी यांनी यावेळी मागणी केली की, आता पर्यंत ज्या ज्या प्रवाश्यांना पंचतारांकित हॉटेल मध्ये क्वारंटाईन करण्यात आले किंवा ज्यांच्या कडून पैसे घेऊन त्यांना क्वारंटाईन न करता त्यांना घरी सोडण्यात आले अशा सर्व लोकांना पालिका आयुक्तांनी आवाहन करून त्यांची माहिती घ्यावी व प्रवाश्यांचा झालेला खर्च त्या अधिकाऱ्यांकडून घेऊन त्या प्रवाश्यांना तो परत करावा व त्या पालिका अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी.
विमानतळावरील पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून गेल्या दीड वर्षात झालेला शंभर टक्के भ्रष्टाचार नव्हे तर दिवसा ढवळ्या टाकलेला डाका असल्याची प्रतिक्रियाही खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केली.तर लोकमतने याप्रश्नी वाचा फोडल्याबद्धल त्यांनी लोकमतचे आभार मानले.