मुंबई : टॅक्सीतून उतरताना लवकर पैसे दिले नाहीत, म्हणून टॅक्सीत बसण्याची वाट बघणाऱ्या चौघांनी टॅक्सीत बसलेल्या प्रवाशाला मारहाण केली. यात चेंबूर येथील इंदिरानगरमधील सुरेंद्र सिंग यांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी एकाला अटक करून अन्य तीन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात केलीआहे.मंगळवारी दुपारी अडीचच्या सुमारास सुरेंद्र हे टॅक्सीने चेंबूर वसाहत परिसराकडे आले. बाहेर जेवायला जाण्यासाठी टॅक्सीची वाट पाहत असलेल्या आरोपी कृष्णा पोमन्ना पोयना याच्यासह अन्य तीन अल्पवयीन मुलांनी टॅक्सीकडे धाव घेतली. मात्र सुरेंद्र यांना भाडे देण्यास उशीर लागल्याने आरोपींनी त्यांच्यासोबत वाद घातला. शाब्दिक बाचाबाचीनंतर त्या चौघांनी सुरेंद्र यांना बेदम मारहाण केली. यात ते बेशुद्ध झाले. मित्राने त्यांनाजवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.या प्रकरणी चेंबूर पोलिसांनी चौघांविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. मंगळवारी रात्री उशिरा चौघांनाही ताब्यात घेतले. त्यातील एकाला अटक करून अन्य तीन अल्पवयीन मुलांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आल्याची माहिती चेंबूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिली.
भाडे देण्यास उशीर केल्याने प्रवाशाची हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2018 5:44 AM