Join us

पहिल्या मेट्रोचे प्रवासी दहा हजारांनी वाढले; मुंबईकरांना पावसात दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 07, 2023 11:02 AM

मुंबई मेट्रो वनने मुंबईकरांना भर पावसात दिलासा दिला

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मार्गावर धावणाऱ्या मुंबई मेट्रो वनने मुंबईकरांना भर पावसात दिलासा दिला असून, ऐनवळी लोकल बंद पडल्यानंतर मेट्रोने अतिरिक्त दहा हजार प्रवाशांना सामावून घेतले आहे. विशेष म्हणजे या अतिरिक्त प्रवाशांमुळे मेट्रोमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या ४ लाख २० हजार झाली आहे. दरम्यान, मुंबईच्या पश्चिम उपनगरांत सेवा देणाऱ्या मेट्रो २ अ आणि मेट्रो ७च्या प्रवासी संख्येत दिवसागणिक वाढच होत असून, ही मेट्रोही वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही दिलासा देत आहे.

कसे वाढले प्रवासी   १० जुलै २०१५ :  ३९८ दिवसांच्या ऑपरेशननंतर १ दशलक्ष प्रवाशांचा पहिला टप्पा गाठला गेला.   २०१९ :  २६४ दिवसांत १ दशलक्ष प्रवासी जोडून विक्रम केला.   २० ऑक्टोबर २०१९ ते २८ फेब्रुवारी २०२२ :  १ दशलक्ष प्रवासी जोडले.   ८ जून २०१४ पासून आतापर्यंत  म्हणजे ८ वर्षे ५ महिन्यांत मेट्रोने ७६ कोटींपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक केली आहे.

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर असा ११.४ किलोमीटरचा लांब कॉरिडॉर पूर्व आणि पश्चिम मुंबई जोडण्याचे काम करतो. या कॉरिडॉरमुळे मुंबईकरांचा प्रवासाचा वेळ ९० मिनिटांवरून २१ मिनिटांवर आला आहे.

 कॅश फ्री प्रवाशांना ऑनलाइन पेमेंट करणे शक्य व्हावे, यासाठी मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडबरोबर कॅश फ्री पेमेंट्सने सहकार्य केले होते.डिजिटल पेमेंटमहामारीमध्ये मुंबई मेट्रो वनने ‘जबाबदार बना, सुरक्षित राहा’ या उपक्रमाला पाठबळ देताना डिजिटल पेमेंट्सचा पुरस्कार केला.

 यूपीआय ॲप सर्व १२ स्थानकांवर डिजिटलीकरण झाले असून, प्रवासी क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी व्हॉट्सॲप, जीपे, भीम, फोन पे असे यूपीआय ॲप वापरत आहेत.

 व्हॉट्सॲप तिकीट व्हॉट्सॲपवरूनदेखील तिकीट खरेदी करता यावे म्हणून मुंबई मेट्रो वनने सेवा सुरू केली. या सेवेमुळे मेट्रोचे तिकीट गहाळ होण्याची भीती नाही.

टॅग्स :मेट्रो