‘मुंबई-अहमदाबाद’वर प्रवाशांची ४ तास रखडपट्टी; पाच ते सहा किमीपर्यंत वाहनांच्या रांगा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 10:34 AM2024-05-17T10:34:17+5:302024-05-17T10:36:45+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.
मुंबई : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर गुरुवारी सकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. खानिवडे टोल नाका ते मनोरपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूने वाहतूक कोंडी झाल्याने सुमारे पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनाच्या रांगा लागल्याने येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची या वाहतूक कोंडीत चार तास प्रवाशी रखडपट्टी झाली. भर उन्हात कोंडीत अडकल्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कल्याणला सभा होती. या सभेमुळे रात्री १२ वाजेपर्यंत अवजड वाहनांस ठाणे हद्दीत मनाई करण्यात आली होती. त्यामुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगत काल अवजड वाहनांना थांबवण्यात आले होते.
अनेकांनी विरुद्ध दिशेने नेली वाहने-
गुरुवार कामाचा दिवस असल्याने हलकी वाहनेही सकाळच्या सुमारास महामार्गावरून निघाली होती. सध्या महामार्गावर काही ठिकाणी सिमेंट काँक्रिटीकरण कामही सुरू आहे. सकाळपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते. मात्र, वाहतूक कोंडी झाल्याने काही वाहनांनी वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी रस्त्याच्या विरुद्ध दिशेने गाड्या नेण्यास सुरुवात केली. यामुळे कोंडीत अधिक भर पडली. दररोज वाहतूक कोंडी होत असल्याने ही वाहतूक कोंडी कधी सुटणार, असा प्रश्न वाहन चालक महामार्ग प्रशासनाला विचारत आहेत.