गळक्या बसेसमुळे प्रवासी त्रस्त
By Admin | Published: July 18, 2014 12:22 AM2014-07-18T00:22:39+5:302014-07-18T00:22:39+5:30
एनएमएमटीच्या नादुरूस्त गाड्यांचा फटका प्रवाशांना बसत आहे. कारण बहुतांशी गाड्यांना गळती लागल्याने प्रवाशांना चिंब भिजत प्रवास करावा लागत आहे.
नवी मुंबई: एनएमएमटीच्या नादुरूस्त गाड्यांचा फटका प्रवाशांना बसत आहे. कारण बहुतांशी गाड्यांना गळती लागल्याने प्रवाशांना चिंब भिजत प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांनी एनएमएमटी प्रशासनाच्या गलथान कारभाराबद्दल संताप व्यक्त केला आहे.
एनएमएमटीच्या गाड्यांची दुरवस्था झाली आहे. खिडक्या तुटल्या आहेत. काचा निखळून पडल्या आहेत. प्रवाशांना बसण्यासाठी असलेल्या आसन व्यवस्थेची दयनीय अवस्था झाली आहे. एकूणच भंगारात निघालेल्या या गाड्यांत बसायला प्रवासी धजावत नाहीत. कारण प्रवासादरम्यान रस्त्यात गाडी कुठे बंद पडेल याचा नेम नाही. यातच सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. मागील आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. याचा फटका एनएमएमटीच्या प्रवाशांना बसला आहे. परिवहनच्या ताफ्यातील बहुतांशी गाड्यांना गळती लागली आहे. त्यामुळे प्रवशांना चिंब अवस्थेत प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे पावसाळ्याअगोदर एनएमएमटीच्या सर्व गाड्यांची डागडुजी करावी, अशी मागणी परिवहन कर्मचारी युनियनच्या वतीने व्यवस्थापनाकडे करण्यात आली होती. त्यानंतर गाड्यांची थातुरमातूर डागडुजी करण्यात आली. मात्र संभाव्य गळती रोखण्याच्या दृष्टीने कोणतेही प्रयत्न करण्यात आले नव्हते.
त्यामुळे आता प्रवाशांना अंगावर पाण्याच्या धारा घेत प्रवास करावा लागत आहे.
याबाबत युनियनने पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला असून गळक्या गाड्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अन्यथा एकही गाडी आगाराबाहेर पडू देणार नाही, असा इशारा युनियनचे सरचिटणीस प्रफुल्ल म्हात्रे यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)