मुंबई : फुकट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भविष्यात जास्तीचा दंड भरावा लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे फुकट्या प्रवाशांवर येणाऱ्या काळात आळा बसण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेच्यामुंबई विभागाने तिकीट नसलेले आणि अनधिकृत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक (कार्य) बी. अरुण कुमार यांनी ९ सप्टेंबरला मध्य रेल्वेच्या मुख्य व्यावसायिक व्यवस्थापक (प्रवासी सेवा) यांना पत्र लिहून रेल्वे बोर्डाकडे दंडवाढीची मागणी केली आहे. सुमारे २० वर्षांपूर्वी दंडाची शेवटची सुधारणा करण्यात आली होती.
२००४ मध्ये तिकीट नसलेल्या प्रवाशांवर लावल्या जाणाऱ्या दंडात बदल केला होता. त्यावेळी ५० रुपयांवरून २५० रुपये इतका दंड केला होता. परंतु, त्यानंतर दोन दशकांमध्ये कोणतीही वाढ झाली नाही. रेल्वेने प्रवाशांसाठी वंदे भारत, तेजस एक्स्प्रेस आणि एसी लोकलसारख्या प्रीमियम गाड्या सुरू केल्या. स्थानक तसेच सेवासुधारणा केल्या. मात्र दंडाच्या दरांमध्ये सुधारणा झाली नसल्याचे पत्रात नमूद केले आहे. वाढती महागाई लक्षात घेता दंड वाढविण्याची गरज असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.
म्हणून दंडवाढ आवश्यक
मध्य रेल्वेने गेल्या आर्थिक वर्षात विनातिकीट प्रवास करणाऱ्या २०.५६ लाख प्रवाशांकडून ११५ कोटी दंड वसूल केला आहे. पश्चिम रेल्वेने ९.६२ लाख प्रकरणांमध्ये ४६ कोटींचा दंड आकारला आहे. उपनगरीय भागात सध्याचा २५० रुपयांचा दंड प्रभावी ठरत नाही. त्यामुळे एसी लोकलसारख्या सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांना गर्दीमुळे आरामदायक प्रवास करता येत नाही. त्यामुळे दंडवाढ आवश्यक असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.