मेट्रो ३ कडे प्रवाशांची पाठ; चार महिन्यांनंतरही अपेक्षित वाढ नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 11:20 IST2025-02-22T11:19:47+5:302025-02-22T11:20:32+5:30
आतापर्यंत एकूण २६ लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दरदिवशी ४ लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो कोसो दूर असल्याचे चित्र आहे.

मेट्रो ३ कडे प्रवाशांची पाठ; चार महिन्यांनंतरही अपेक्षित वाढ नाही
मुंबई : मुंबईतील पहिल्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा सुरू होऊन चार महिने उलटल्यानंतरही अद्याप प्रवासी संख्या रोडावलेली आहे. गेल्या चार महिन्यांत या मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी केवळ १९,४४० प्रवाशांनी प्रवास केला आहे, तर आतापर्यंत एकूण २६ लाख ६३ हजार प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे दरदिवशी ४ लाख प्रवासी संख्येच्या उद्दिष्टापासून भुयारी मेट्रो कोसो दूर असल्याचे चित्र आहे.
कुलाबा ते आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेच्या आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याचा १२.६९ किमी लांबीचा मार्ग ७ ऑक्टोबरपासून प्रवाशांच्या सेवेत आला. पहिल्या दिवशी या मेट्रो मार्गिकेवरून १८ हजार प्रवाशांनी प्रवास केला होता, तर पहिल्या महिन्यात या मेट्रो मार्गिकेवरून दरदिवशी सरासरी २०,४२६ प्रवाशांकडून मेट्रोतून प्रवास केला जात होता. चार महिन्यांनंतर या प्रवासी संख्येत वाढ होण्याची अपेक्षा होती.
आतापर्यंत २६ लाख ६३ हजार प्रवाशांचा प्रवास
मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने दिलेल्या आकडेवारीनुसार, ७ ऑक्टोबर ते २० फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत या मेट्रो मार्गिकेवरून २६,६३,३७९ प्रवाशांनी प्रवास केला आहे. त्यामुळे अद्यापही प्रवाशांनी या मेट्रोकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.
मेट्रो ३ मार्गिकेसाठी ३७ हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. या मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील मार्गावरून दरदिवशी ४ लाख प्रवासी प्रवास करतील, असा एमएमआरसीचा अंदाज आहे. मात्र, चार महिन्यांनंतरही प्रवासी संख्येत फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे ४ लाख प्रवासी संख्या कधी आणि कसे गाठणार, याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
मेट्रोच्या एका फेरीला केवळ ९१ जणांचा प्रवास
मेट्रो ३ मार्गिकेवरील गाडी ८ डब्यांची आहे. या गाडीची २५०० प्रवाशांची क्षमता आहे.
मार्गिका सुरू झाल्यापासून तिच्यावरून गाडीच्या एकूण २९,१६२ फेऱ्या झाल्या आहेत. त्या माध्यमातून २६,६३,३७९ जणांनी प्रवास केला आहे.
परिणामी, बीकेसी ते आरे यादरम्यान एका फेरीमागे सरासरी केवळ ९१ प्रवाशांनीच प्रवास केल्याची स्थिती आहे.