पश्चिम रेल्वेवर आज प्रवाशांचे होणार हाल; या गाड्यांवर लक्ष ठेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 08:32 AM2023-04-23T08:32:42+5:302023-04-23T08:33:37+5:30
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वैतरणा-साफळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पाच गर्डर्स टाकण्यात येणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : पश्चिम रेल्वेच्या वैतरणा ते सफाळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर पुलांचे ५ गर्डर टाकण्यासाठी रविवारी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल आणि मेमू गाड्या रद्द करण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वैतरणा-साफळे स्थानकांदरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या बांधकामासाठी पाच गर्डर्स टाकण्यात येणार आहेत. रविवारी सकाळी ८:५५ ते १०:५५ या वेळेत ट्रॅफिक कम पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकदरम्यान बोईसर-वसई रोड मेमू आणि दुपारी १२ वाजताची विरार -चर्चगेट लोकल रद्द असेल. डोंबिवली-बोईसर मेमू वसई रोड ते बोईसर, डहाणू रोड-बोरिवली लोकल केवळे रोड ते बोरिवलीदरम्यान रद्द केली आहे. चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोडदरम्यान धावणार आहे. डहाणू रोड-विरार लोकल केळवे रोड ते विरार दरम्यान रद्द केली आहे. चर्चगेट -डहाणू रोड लोकल केळवे रोड ते डहाणू रोड दरम्यान धावणार आहे.
या गाड्यांवर लक्ष ठेवा
सुरत-विरार एक्स्प्रेस पालघर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे. विरार-वलसाड गाडी विरार ते पालघरदरम्यान रद्द केली आहे. याशिवाय भगत की कोठी-वांद्रे टर्मिनस, जोधपूर-वांद्रे टर्मिनस सूर्या नगरी एक्स्प्रेस, भूज - वांद्रे टर्मिनस कच्छ एक्स्प्रेस, अहमदाबाद - मुंबई सेंट्रल कर्णावती एक्स्प्रेस, बिकानेर - दादर एक्स्प्रेस, जामनगर - तिरुनेलवेली एक्स्प्रेस उशिरा धावणार आहे.