आता प्रवासी करणार लोकलचे थेट लोकेशन ट्रॅक, रेल्वेचे यात्री ॲप प्रवाशांच्या सेवेत
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2022 07:07 AM2022-07-14T07:07:56+5:302022-07-14T07:08:09+5:30
सर्व लोकलवर जीपीएस बसविण्यात आले असून, लोकल ट्रेनचे लोकेशन मिळवत नकाशावर थेट लोकलचे स्थान पाहता येईल.
मुंबई : मध्य रेल्वेच्या प्रवाशांना आता यात्री मोबाइल ॲप्लिकेशनवर मध्य रेल्वेतील लोकल ट्रेनच्या थेट लोकेशनची माहिती मिळू शकणार आहे. ही सुविधा मध्य रेल्वे, हार्बर, ट्रान्सहार्बर आणि बेलापूर/नेरूळ-खारकोपर लाइनवरील गाड्यांच्या प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकावर बुधवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांच्या उपस्थितीत यात्री ॲपच्या या वैशिष्ट्याचे प्रात्यक्षिक पार पडले.
यावेळी मुंबईचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल, मुख्य वाणिज्य व्यवस्थापक (प्रवासी सेवा) इती पांडे, आणि इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते. ‘यात्री’ हे एक मोबाइल ॲप्लिकेशन आहे. या मोबाइल ॲप्लिकेशनमुळे प्रवाशांना प्रवासाचे उत्तम नियोजन करण्यात मदत करेल. सर्व लोकलवर जीपीएस बसविण्यात आले असून, लोकल ट्रेनचे लोकेशन मिळवत नकाशावर थेट लोकलचे स्थान पाहता येईल.
यात्री ॲपची वैशिष्ट्ये
- थेट अपडेट.
- लोकलचे अपडेट केलेले वेळापत्रक.
- उपनगरीय गाड्यांचे तिकीट भाडे तपशील.
- स्त्रोत आणि गंतव्य स्थानके प्रविष्ट करून प्रवासाचे नियोजन.
- रेल्वे आणि वैद्यकीय आपत्कालीन क्रमांक.
- आवडत्या गाड्या आणि मार्गांवर अलर्ट सेट करणे.
आणखी काय?
- मेल एक्स्प्रेस ट्रेनच्या ठिकाण आणि पीएनआर स्थिती.
- मुंबई विभाग, मध्य रेल्वेवरील स्थानकांवर स्थानकनिहाय सुविधा पाहणे.
- तत्काळ मदतीसाठी रेल्वे आपत्कालीन स्थितीशी संपर्क साधणे.
- मेट्रो, मोनो, फेरी आणि बस माहिती आणि वेळापत्रक.
- वापरकर्ते अभिप्राय आणि सूचना.
यात्री ॲप दैनंदिन उपनगरीय प्रवाशांसाठी रेल्वे धावण्याविषयीची माहिती मिळविण्यासाठी आणि त्यांच्या प्रवासाचे उत्तम नियोजनासाठी उपयुक्त साधन आहे. विशेषत: इतर कोणत्याही कारणांमुळे किंवा मेगाब्लॉक इत्यादींमुळे रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या काळात ट्रेन रद्द करणे किंवा विशेष गाड्या चालविल्याबद्दल त्यांना माहिती मिळू शकते.
अनिल कुमार लाहोटी,
महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे