मुंबई : स्वच्छता मुंबई अभियानात एकीकडे शहरभर सफाई मोहीम सुरू असताना पालिकेत मात्र कचऱ्यातूनही पैसे ओढण्याचा प्रकार सुरू आहे़ नाक्यानाक्यावर साठणाऱ्या कचऱ्याच्या तक्रारी आल्यानंतर २० हजार कचराकुंड्या खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला़ मात्र याचे दर कमी असल्याने यापूर्वी कचराकुंड्यांच्या खरेदीत आर्थिक नुकसान झाल्याचे उजेडात आले आहे़ यात पावणेआठ लाख रुपयांचा भुर्दंड पालिकेला बसला आहे़दरवर्षी जाहीर होणाऱ्या सफाई मोहिमा कचऱ्यातच जात होत्या़ मात्र देशाच्या पंतप्रधानांनीच सफाई मोहीम छेडल्यामुळे पालिका अधिकारी-कर्मचारी कामाला लागले आहेत. परंतु शहरात जोरदार सफाई मोहीम सुरू असताना अनेक झोपडपट्ट्यांमध्ये कचराकुंड्यांची कमतरता जाणवते आहे़ त्यामुळे कचराकुंड्यांची संख्या वाढविण्याची मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून सुरू आहे़त्यानुसार २० हजार नवीन कचऱ्याचे डबे खरेदी करण्यात येणार आहेत़ कचरा उचलण्यासाठी संयुक्तिक कॉम्पॅक्टर गाड्या, बंदिस्त कंटेनर्स आणि कचरापेट्या पालिका वापरत आहे़ १२० लीटर क्षमतेच्या कचऱ्यापेट्या उचलणे व रिकाम्या करणे सोपे असल्याने शाळा, रुग्णालयांमध्ये त्याची मागणी अधिक आहे़ त्यामुळे या कचरापेट्या खरेदी करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण अधिकारी देत आहेत़ (प्रतिनिधी)
पावणेआठ लाख रुपये कचऱ्यात
By admin | Published: November 07, 2014 1:35 AM