खलील गिरकर
मुंबई : पासपोर्ट काढण्यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सुलभपणे सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यात आणखी ४ ठिकाणी लवकरच टपाल कार्यालयांत पोस्ट आॅफिस पासपोर्ट सेवा केंद्राची स्थापना करण्यात येणार आहे. सांताक्रुझ, भिवंडी, अलिबाग व नंदुरबार या चार ठिकाणांचा यामध्ये समावेश आहे. सध्या राज्यात १० ठिकाणी अशी केंद्रे सुरू आहेत. देशभरात ४१२ ठिकाणी ही केंद्रे कार्यरत आहेत.देशात सध्या केवळ ८ टक्के नागरिकांकडेच पासपोर्ट असून हे प्रमाण वाढविण्याचा भाग म्हणून ही केंद्रे सुरू करण्यात येत असल्याची माहिती मुंबईचे विभागीय पासपोर्ट अधिकारी तुलसीदास शर्मा यांनी ‘लोकमत’शी संवाद साधताना दिली.
राज्यात राजापूर, औरंगाबाद, धुळे, जळगाव, भुसावळ, विक्रोळी, शीव, दमण, सिल्वासा, वाशी या ठिकाणी ही केंद्रे सुरू आहेत. प्रत्येक लोकसभा क्षेत्रात एक केंद्र उभारण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. कल्याण-डोंबिवली व पालघर जिल्ह्यात पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यासाठी टपाल विभागाला आवश्यक जागा मिळत नसल्याने या केंद्रांची उभारणी रखडली आहे. जागा उपलब्ध झाल्यावर त्वरित पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. सेवा केंद्रे उभारण्यासाठी टपाल विभागाला पासपोर्ट विभागाकडून प्रति केंद्र ३ लाख रुपये देण्यात येतात; त्याशिवाय प्रत्येक अर्जामागे त्यांना ठरावीक रक्कम दिली जाते. या केंद्रांमध्ये टपाल विभागाचे दोन कर्मचारी व पासपोर्ट विभागाचा एक अधिकारी कार्यरत असतो, अशी माहिती शर्मा यांनी दिली.तत्काळसाठीच्या अर्जांत वाढतत्काळ पासपोर्ट मिळविण्याच्या नियमामध्ये बदल करण्यात आल्याने तत्काळ पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. पूर्वीप्रमाणे आता त्यासाठी आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांची स्वाक्षरी लागत नाही; तर केवळ १६ कागदपत्रांपैकी ३ कागदपत्रे असल्यास अर्जदारांना तत्काळ पासपोर्ट दिला जातो. त्यामुळे सर्वसाधारण अर्जांपेक्षा तत्काळसाठीच्या अर्जांत वाढ झाली आहे. पासपोर्टसाठी अर्ज करताना काही वेळा बोगस वेबसाइटच्या माध्यमातून अर्जदारांची फसवणूक केली जाण्याचे प्रकार होत असल्याने अर्जदारांनी केवळ अधिकृत वेबसाइटच्या माध्यमातूनच अर्ज करावा, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे.