मुंबई : यावर्षी हज यात्रेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या मुस्लीम बांधवांना पासपोर्ट, वैद्यकीय प्रमाणपत्र व आगाऊ ८१ हजार रुपये भरण्याचे आवाहन केंद्रीय हज कमिटी आॅफ इंडियाने केले आहे. कमिटीच्या संकेतस्थळावर आॅनलाइन किंवा एसबीआय/यूबीआय बॅँकेच्या खात्यावर २३ एप्रिलपर्यंत ही रक्कम भरण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.सौदी अरेबियात प्रतिवर्षी भरणाऱ्या या यात्रेसाठी हज कमिटीकडून जाऊ इच्छिणाऱ्या भाविकांची गेल्या महिन्यात संगणकीय सोडत काढण्यात आली. त्यातील निवड झालेल्या ९८ हजार यात्रेकरूंच्या पुढच्या प्रकियेला समितीने सुरुवात केली आहे. सौदी सरकारकडून अद्याप यात्रेसाठी यंदा दराची निश्चिती झालेली नाही. त्यामुळे सुरुवातीला समितीने आगाऊ स्वरूपात पहिल्या टप्प्यात ८१ हजार रुपये शुल्क घेण्याचा निर्णय घेतला आहे. वैद्यकीय प्रमाणपत्र, पासपोर्ट जमा करण्यासाठी २३ एप्रिलपर्यंत मुदत दिलेली आहे. प्रत्येक राज्यातील हज समितीने त्याबाबतचा सविस्तर अहवाल २९ एप्रिलपर्यंत केंद्रीय हज समितीकडे द्यावयाचा आहे. गेल्यावर्षी हज यात्रेवेळी घडलेल्या दोन भीषण दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर हज कमिटीने यंदा कमिटीकडून प्रत्येक हज यात्रेकरूला आपत्ती ओढावल्यास स्वत:चा बचाव करण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी गेल्या आठवड्यात देशभरातील ५०० प्रशिक्षकांना तज्ज्ञाकडून मार्गदर्शनही करण्यात आले आहे. त्यांच्याकडून देशातील प्रत्येक जिल्ह्यात शिबिर घेऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)
हज यात्रेसाठी पासपोर्ट, आगाऊ रक्कम जमा करावी!
By admin | Published: April 18, 2016 1:57 AM