पासपोर्ट कार्यालयाचे कामकाज दीड महिन्यानंतर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:08 AM2021-06-09T04:08:01+5:302021-06-09T04:08:01+5:30
- परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना दिलासा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. ...
- परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्यांना दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्रादेशिक पारपत्र (पासपोर्ट) कार्यालयाने मुंबईकरांना काहीसा दिलासा दिला आहे. १५ जूनपर्यंत स्थगित केलेले कामकाज ७ जूनपासून मुदतीआधी सुरू करण्यात आले आहे.
राज्यात पुन्हा कोरोना उद्रेक सुरू झाल्याने २३ एप्रिलला प्रादेशिक पारपत्र कार्यालय मुंबई अंतर्गत येणाऱ्या सर्व पासपोर्ट सेवा केंद्र आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सर्व्हिस सेंटरचे कामकाज स्थगित करण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी स्थगितीस मुदतवाढ देण्यात आली. ३१ मे रोजी लॉकडाऊनमध्ये वाढ झाल्यानंतर पारपत्र कार्यालयाने १५ जूनपर्यंत कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.
४ जून रोजी राज्य सरकारने निर्बंध शिथिल केल्यानंतर मुंबईतील लोकल वगळता इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सोमवारपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्या. त्यामुळे सर्व बाबींचा आढावा घेऊन प्रादेशिक पारपत्र कार्यालय मुंबई अंतर्गत येणारी सर्व पासपोर्ट सेवा केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात लोअर परळ, अंधेरी, मालाड, ठाणे आणि नाशिकमधील पासपोर्ट सेवा केंद्रांचा समावेश आहे.
या निर्णयामुळे परदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. शिवाय पासपोर्टच्या नूतनीकरणाअभावी परदेशवारी रखडलेल्यांनाही याचा फायदा होईल. दरम्यान, ऑनलाईन नोंदणी केल्याशिवाय पासपोर्ट कार्यालयात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती प्रादेशिक पारपत्र कार्यालयाने दिली.
........................................