- राजेश भोस्तेकरअलिबाग - रायगडकर ज्याची अनेक वर्ष आतुरतेने वाट पाहत असलेले पासपोर्ट कार्यालय अखेर शनिवार पासून अलिबाग येथे जिल्हा पोस्ट कार्यालयात सुरू होते आहे. त्यामुळे मुंबई, ठाणे शहरात जाऊन पासपोर्ट काढण्यापासून नागरिकांची सुटका झाली आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे, आमदार जयंत पाटील, आमदार महेंद्र दळवी आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थितीत पासपोर्ट कार्यालयाचा लोकार्पण सोहळा शनिवारी २९ जुलै रोजी संपन्न होणार आहे. खासदार सुनील तटकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पासपोर्ट कार्यालय रायगड करांच्या सेवेत दाखल झाले आहे.
रायगड जिल्ह्यातून अनेकजण पर्यटनास परदेशात जात असतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट आवश्यक आहे. रायगड कराना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबई किंवा ठाणे जावे लागत होते. त्यामुळे वेळ आणि आर्थिक नुकसान होत होते. रायगड मध्येही पासपोर्ट कार्यालय असावे अशी मागणी अनेक वर्ष रायगडकर करीत होते. विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी पासपोर्ट कार्यालय अलिबाग येथे सुरू करण्याबाबत केंद्र स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला होता. खासदार सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
अलिबाग येथे जिल्हा पोस्ट कार्यालयात तळमजला येथे हे कार्यालय सुरू होत आहे. आधी पोस्ट कार्यालयातील पहिल्या मजल्यावर पासपोर्ट कार्यालय काम करण्यात आले होते. मात्र दीव्यांग, जेष्ठ नागरिक यांना पहिल्या मजल्यावर जाणे अडचणीचे असल्याने तळमजला येथे नव्याने काम करून कार्यालय तयार करण्यात आले आहे. केंद्राच्या पासपोर्ट विभागानेही पाहणी करून कार्यालय जागा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. अखेर पासपोर्ट कार्यालयाचे रायगड करांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. त्यामुळे पासपोर्ट साठी करावी लागणारी मुंबई वारी नागरिकांची आता थांबणार आहे.