बनावट, अपुऱ्या कागदपत्रांवर अवघ्या तीन हजारांत पासपोर्ट; अधिकाऱ्यांची दलालांशी हातमिळवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 07:36 AM2024-07-01T07:36:40+5:302024-07-01T07:37:09+5:30
नातलगांच्या खात्यावर लाचेची रक्कम, सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांची तपासणी केली
मुंबई - मालाड आणि लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रात पासपोर्ट अधिकाऱ्यांवर सीबीआयने केलेल्या कारवाईने खळबळ उडाली आहे. अवघ्या दोन ते तीन हजारांत पासपोर्ट अधिकारी दलालांना पासपोर्ट देत असल्याचेही त्यांच्या बँक व्यवहारांवरून स्पष्ट झाले आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांकडून मित्र, पत्नी तसेच अन्य नातेवाइकांच्या खात्यावर पैसे घेतल्याचे उघड झाले आहे.
सीबीआयने १४ पासपोर्ट अधिकाऱ्यांसह ३२ जणांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत १२ गुन्हे दाखल केले आहेत. पारपत्र सेवा केंद्रांवरील पारपत्र साहायक आणि दलाल यांच्याशी संबंधित नाशिक व मुंबईतील ३३ ठिकाणी सीबीआयने शोध मोहीम राबवून महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली आहेत. आरोपी लोअर परळ आणि मालाडच्या पासपोर्ट सेवा केंद्रांवर कार्यरत होते. संबंधित पासपोर्ट अधिकारी दलालांशी हातमिळवणी करून गैरव्यवहार करत असल्याचा आरोप आहे. ते पुरेशी कागदपत्रे नसतानाही किंवा बनावट कागदपत्रांच्या आधारे दलालांच्या ग्राहकांना पासपोर्ट देत असत.
सीबीआयच्या अधिकाऱ्यांसह दक्षता विभागाचे अधिकारी आणि विभागीय पासपोर्ट कार्यालयातील अधिकाऱ्यांनी २६ जूनला परळ आणि मालाड येथील पासपोर्ट सेवा केंद्रांची तपासणी केली. संशयित अधिकाऱ्यांच्या कार्यालयांची आणि मोबाइलची तपासणी करण्यात आली. कार्यालयातील कागदपत्रे, सोशल मीडियावरील संदेश आणि यूपीआयवरील आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात आली. त्यात संबंधित अधिकाऱ्यांनी दलालांशी काही व्यवहार केल्याचे आढळले. दलालांचे काम करण्याच्या बदल्यात त्यांनी हे व्यवहार केल्याचा संशय आहे. यात लोअर परळ कार्यालयातील सर्वाधिक अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
दलालांकडून अधिकाऱ्यांना किती पैसे मिळाले?
लोअर परळ येथील पासपोर्ट सेवा केंद्रातील कनिष्ठ अधिकारी रवी सिवातच याच्या बँक खात्यात दलाल श्रीनिवास शामलकडून जूनमध्ये ३ हजार रुपये आल्याचे आढळले. कनिष्ठ अधिकारी रवी प्रकाश मीनाच्या बँक खात्यात मे २०२३ ते मे २०२४ दरम्यान २५ लाख ४७ हजार रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाल्याचे आढळले. कनिष्ठ अधिकारी हिमांशू यादवच्या खात्यात दलाल जय हरयाच्या बँक खात्यातून साडेपाच हजार रुपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
कनिष्ठ अधिकारी आश्रम मीनाच्या खात्यात दलाल पराग तालकरकडून ५७ हजार ५०० रुपये आल्याचे आढळले आहे. अमन नावाच्या अधिकाऱ्यानेही गेल्या तीन महिन्यांत तीन दलालांकडून ३३ हजार ५०० रुपये स्वीकारले आहेत. वरिष्ठ पासपोर्ट सहाय्यक अशोक कुमार यांच्या खात्यात १० हजार, तर हेमंत मीनाच्या खात्यातही १० हजारांचे संशयित व्यवहार आढळले. मालाड कार्यालयातील व्हेरिफिकेशन ऑफिसर आकाश राठीच्या खात्यात २३ हजार ५०० रुपयांचे संशयास्पद व्यवहार झाले आहेत. अशाच प्रकारे अन्य अधिकाऱ्यांच्या बँक खात्यातही संशयास्पद व्यवहार आढळले असून त्यानुसार सीबीआय अधिक तपास करत आहे. त्यांच्या बँक खात्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या बँक खात्यांचीही तपासणी सीबीआय करीत आहे.