ऐषोआरामासाठी करायचा चोरी, सहा महिन्यांपासून देत होता, रेल्वे पोलिसांनी केली अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:09 AM2017-10-14T03:09:38+5:302017-10-14T03:10:52+5:30
तब्बल सहा महिन्यांपासून लोकल-एक्सप्रेसमधील साखळी चोराला रेल्वे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेच्या उपआयुक्तांनी नेमलेल्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली.
मुंबई : तब्बल सहा महिन्यांपासून लोकल-एक्सप्रेसमधील साखळी चोराला रेल्वे पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या. मध्य रेल्वेच्या उपआयुक्तांनी नेमलेल्या विशेष पथकाने ही कामगिरी बजावली. उमेश मालोजी कांबळे (२५) या आरोपीला पनवेल येथून अटक केली. आरोपीची पोलिस कोठडी शुक्रवारी पूर्ण झाली आहे. ५ गुन्हयांमधून आरोपीकडून १३५ ग्रॅम वजनाचे २ लाख ९६ हजार रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
हार्बर रेल्वे आणि कोकणाकडे जाणाºया लांब पल्ल्यांच्या मेल-एक्सप्रेसमध्ये सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. पनवेल रेल्वे पोलिस स्थानकांत नोंदवलेल्या गुन्ह्यांमधून ही माहिती समोर येत आहे. मेल-एक्सप्रेसमधील खिडकी जवळ बसलेल्या महिला प्रवाशांच्या गळ््यातील मंगळसूत्रे आणि अन्य दागिने ओढून पळ काढला, या तक्रारींमध्ये सारख्याच वर्णनाच्या आरोपीचा समावेश होता. त्यानूसार संशयित आरोपीविरुद्ध रेल्वे पोलिसांनी विशेष पथक स्थापन करत शोध मोहीम सुरु केली.
सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या माहितीनूसार संशयित आरोपी ९ आॅक्टोबर रोजी नेत्रावती एक्सप्रेसजवळ आढळला. चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना आरोपी कांबळेला रेल्वे पोलिसांनी बेड्या ठोकल्या. चौकशी दरम्यान आरोपीने पनवेल येथे स्थानक आणि परिसरात सोनसाखळी चोरीची कबूली दिली आहे. चोरी केलेल दागिने कोल्हापूर आणि रत्नागिरी येथील सराफांना विकत असल्याचे आरोपीने सांगितले.
...म्हणून करत होता तो चोरी
मुळचा कणकवली येथे राहणारा आरोपी उमेश कांबळे केवळ चोरी करण्याच्या उद्देशाने विनातिकिट पनवेल येथे पोहचत होता. एक्सप्रेस पनवेल स्थानकावर येताच आरोपी खिडकीजवळील प्रवाशांवर लक्ष ठेवत असे. एक्सप्रेस सुरु होताच आरोपी सोनसाखळी चोरुन पळ काढत असे. उमेशने बारावीपर्यंत कला शाखेत शिक्षण घेतले आहे. ऐषोआरामासाठी आरोपी चोरी करत असल्याची माहिती रेल्वेचे मध्य परिमंडळचे उपायुक्त समाधान पवार यांनी दिली.