बाललैंगिक शोषण रोखण्यासाठी बेस्ट बसमध्ये ‘पाेस्टर’ उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 12:23 PM2023-11-21T12:23:21+5:302023-11-21T12:23:31+5:30
प्रवासादरम्यान सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत जनजागृती
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लैंगिक शोषणाचे अनेक मुले बळी पडत आहेत. ही बाब लक्षात घेत दैनंदिन प्रवासात होणारे शोषण रोखण्यासाठी बेस्ट उपक्रमाने व ‘अर्पण’ने पुढाकार घेतला आहे. १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या बाल सुरक्षा सप्ताहात बाललैंगिक शोषणाबाबत जनजागृती करण्यात येणार असून, त्याकरिता अर्पण या संस्थेकडून बसगाड्यांमध्ये सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्शाबाबत माहितीपूर्ण पाेस्टल लावणारे जाणार आहेत.
मुलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने सक्रिय पाऊल म्हणून अर्पण ही संस्था बेस्ट कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण सत्र आयोजित करीत असून याद्वारे बाललैंगिक शोषणाबद्दल जनजागृती करण्यावर लक्ष केंद्रित करणार आहे.
दरदिवसाला १७० बाललैंगिक शोषणाची शिकार
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (एनसीआरबी) यांच्या २०२१ या वर्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दररोज १७० बाल लैंगिक शोषणाची प्रकरणे नोंदविली जातात. म्हणजेच, दर तासाला ७ प्रकरणे नोंदविली जातात.
वाहतुकीमध्ये बाल लैंगिक शोषणाच्या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी ‘अर्पण’, ‘बेस्ट’चा हा चांगला उपक्रम आहे. लहान नागरिकांसाठी मुंबईची सार्वजनिक वाहतूक सुरक्षित आणि अधिक संरक्षक बनविण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत आहोत.
- अदिती तटकरे, महिला व बालविकास विभाग मंत्री
लहान मुलांचा प्रवास सुरक्षित करण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहोत. अर्पण या संस्थेच्या मदतीने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि शहरातील मुलांच्या कल्याणासाठी योगदान देण्यासाठी अथक काम करत राहू
- विजय सिंघल,
महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम