खड्ड्याने घेतला पोलिसाचा बळी! विलेपार्ले पोलीस ठाण्यात होते कार्यरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2017 03:27 AM2017-09-08T03:27:37+5:302017-09-08T03:30:21+5:30
विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संतोष एकनाथ शिंदे (४५) यांचे वाशीतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले.
मुंबई : विलेपार्ले पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस शिपाई संतोष एकनाथ शिंदे (४५) यांचे वाशीतील एका रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. गुरुवारी खड्ड्यात पडल्याने त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. ज्यात ते गंभीर जखमी झाले होते.
विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण विभागात शिंदे कार्यरत होते. ३१ आॅगस्ट रोजी रात्री २च्या सुमारास मुंबईवरून नेरूळ येथे मोटारसायकल क्रमांक (एमएच ४३ डब्लू ४६९९)ने घरी निघाले होते. वाशी गाव सिग्नलजवळील ब्रिजजवळील रस्त्यावर अंधार असल्याने त्यांना रस्त्यावरील मोठमोठे खड्डे दिसले नाहीत आणि त्यांच्या गाडीला अपघात झाला.
त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना तत्काळ वाशीच्या एमजीएम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे गुरुवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते १९९६ साली पोलीस खात्यात दाखल झाले होते. पोलीस आयुक्तांकडून ‘बेस्ट डिटेक्शन’साठी त्यांना चार वेळा गौरविण्यातदेखील आले होते. गुन्हे उघडकीस आणणे व गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत करण्यासाठी त्यांना १३८ पोलीस बक्षिसे मिळालेली आहेत. शिंदे यांच्यावर सातारा येथील आसगावमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात मुलगा विघ्नेश (१३), मुलगी सई (८) पत्नी आणि आई असा परिवार आहे.