Join us  

पत्रीपूल, भायखळा-परळचे पादचारी पूलही धोकादायक; आयआयटीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2018 2:01 AM

कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने मध्य रेल्वेने तो तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचे आणि त्वरित पाडण्याचे पत्र कल्याण-डोंबिवली पालिकेला दिले आहे.

मुंबई : कल्याण पूर्व-पश्चिमेला जोडणारा ब्रिटिशकालीन पत्रीपूल धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिल्याने मध्य रेल्वेने तो तत्काळ वाहतुकीसाठी बंद करण्याचे आणि त्वरित पाडण्याचे पत्र कल्याण-डोंबिवली पालिकेला दिले आहे. भायखळा आणि परळचे वाहतुकीचे पूलही धोकादायक असल्याचे अहवाल आयआयटीने दिले आहेत, पण ते मिळाले नसल्याचे सांगत मध्य रेल्वेने त्यावर अजून भूमिका घेतलेली नाही. करी रोडचा जुना पादचारी पूलही धोकादायक झाल्याने तोही लवकरच बंद होण्याची चिन्हे आहेत.अंधेरीत पादचारी पूल पडल्यानंतर सध्या रेल्वेवरून जाणाऱ्या सर्वच पुलांची पाहणी आयआयटीच्या नेतृत्वाखालील विशेष पथक करीत आहे. त्यांच्या अहवालात पत्रीपूल वाहतुकीसाठी धोकादायक ठरवण्यात आला आहे. त्याची उभारणी ब्रिटिश काळातील आहे. त्याला पर्यायी पूल काही वर्षांपूर्वी बांधण्यात अला. मात्र तोही पुरेसा रुंद नसल्याने नेतीवली ते कोन असा थेट उभारण्याचा प्रस्ताव होता. मात्र शीळ ते भिवंडी उड्डाण रस्ता आणि या मार्गाचे सहापदीकरण करण्याच्या नव्या प्रकल्पांमुळे हे काम मागे पडले. सध्या या पुलावरून हलक्या वाहनांचीच वाहतूक सुरू ठेवल्याने पत्रीपूल ते शीळफाटा मार्गावर प्रचंड वाहतूककोंडी होते.करी रोड स्थानकाला जोडणारा दादर दिशेकडचा पादचारी पूलही धोकादायक असल्याचा अहवाल आयआयटीने दिला आहे. भायखळा अणि परळचा वाहतुकीचा पूलही धोकादायक ठरवल्याची माहिती आहे. अधिकृत अहवाल हाती आला, की हे पूलही बंद करण्याबाबत मध्य रेल्वे मुंबई पालिकेला कळवणार असल्याचे रेल्वेच्या अधिकाºयांनी सांगितले.बदलापूर पादचारी पूल २६ दिवसांसाठी बंदबदलापूर स्थानकातील फलाट क्रमांक १, २ आणि ३ यांना जोडणारा पादचारी पूल दुरुस्तीच्या कारणास्तव बंद करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ९ आॅगस्ट ते ३ सप्टेंबर या कालावधीदरम्यान तो बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांनी स्थानकातील अन्य पुलांचा वापर करावा, असे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.अंधेरी पादचारी पूल ९० दिवसांसाठी बंदअंधेरी स्थानकातील महापालिकेचा पादचारी पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ६ आॅगस्ट ते ३ नोव्हेंबर या काळात पुलाच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. या काळात प्रवाशांनी अंधेरी स्थानकातील उत्तरेकडील पादचारी पुलाचा वापर करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.आयआयटीच्या अहवालानुसार पत्रीपूल धोकादायक ठरवण्यात आला आहे. त्यावरील वाहतूक त्वरित बंद करून तो पाडण्याचे पत्र कल्याण-डोंबिवली पालिकेला दिले आहे. पूल बंद करण्याचा निर्णय पालिकेने घ्यावा.- सुनील उदासी, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

टॅग्स :मुंबई