लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रामदेवबाबांच्या पतंजली संस्थेने बनविलेल्या कोरोनील या औषधावर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याबाबतचे योग्य प्रमाणीकरण मिळाल्याशिवाय हे औषध महाराष्ट्रात विक्रीसाठी परवानगी दिली जाणार नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी स्पष्ट केले आहे.
पंतजलीने कोरोनापासून प्रतिबंध करण्यासाठी कोरोनील हे औषध बाजारात आणले आहे. केंद्र सरकारमधील दोघा ज्येष्ठ मंत्र्यांनी त्याला पाठिंबा दिला आहे. याबाबत बोलताना गृहमंत्री म्हणाले, आयएमएबरोबरच जागतिक आरोग्य संघटनेने (हू)देखील हे औषध कोरोनावर परिणामकारक असल्याचा पतंजली आयुर्वेदचा दावा फेटाळला आहे. घाईघाईने हे औषध बाजारात आणणे चुकीचे आहे, ज्येष्ठ केंद्रीय मंत्र्यांनी त्याला तातडीने समर्थन देणे योग्य नाही.
उपरोक्त दोन आरोग्य संस्था आणि इतर संबंधित सक्षम आरोग्य संस्थांकडून योग्य प्रमाणीकरण होणे गरजेचे आहे. त्याची पूर्तता झाल्याशिवाय पतंजलीचे कोरोनील हे औषध विक्रीस महाराष्ट्रात परवानगी दिली जाणार नाही. त्याबाबतची सूचना सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत. नागरिकांही त्याबाबतच्या जाहिरातीला अजिबात बळी पडू नये, असे आवाहनही देशमुख यांनी राज्यातील जनतेला केले आहे.