पारोळ : अंबाडी शिरसाड रस्त्यावर पावसाची सुरूवात होताच खड्डे पडायलाही सुरूवात झाली असून पहिल्या पावसातच रस्ता आजारी झाला आहे.अंबाडी शिरसाड मार्ग म्हणजे ग्रामीण भागातील जनतेची जीवन वाहिनी असून या रस्त्यावरून रोजचे हजारो संख्येने कामगार, विद्यार्थी, रुग्ण, गणेशपुरी व वजे्रश्वरी येथे येणारे भावीक प्रवास करत असतात. पावसाळी मौसमात नेहमी या रस्त्यावर खड्ड्याचे साम्राज्य असते. या खड्ड्यातुन वाहन चालवताना वाहन चालकाला तारेवरची कसरत करावी लागते. त्याचप्रमाणे दुचाकीस्वाराचे मोठ्या प्रमाणात अपघात या खड्ड्यामुळे होतात. कारण खड्ड्यात पाणी असले तर दुचाकी स्वाराला तो खड्डा किती मोठा आहे याचा अंदाज बांधता येत नसल्याने दुचाकी आदळुन अपघात घडतात. या खड्ड्यामुळे प्रवासाला वेळही जास्त लागत असून त्यामुळे वाहनाला इंधन जास्त लागते. त्याचप्रमाणे वाहनाच्या दुरूस्तीच्याही खर्चात वाढ होते अशी वाहनचालकांची ओरड आहे.अंबाडी, शिरसाड मार्गाच्या दुरूस्तीचे काम सुत्रिम कंपनीकडे असून काही ठिकाणी जो मार्ग खड्ड्याने भरला आहे तो तर मे महिन्याच्या अखेरीला बनवला आहे. यावरून या कंपनीच्या कामाचा दर्जाही नागरीकांच्या लक्षात येत आहे. पावसाची सुरूवात होताच रस्त्याची ही अवस्था आहे तर पुढे काय स्थिती या रस्त्याची असेल हा प्रश्न ग्रामीण जनतेला पडला आहे.
पावसामुळे रस्त्यावर खड्डेच खड्डे
By admin | Published: July 16, 2014 12:50 AM