आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तयार केले खड्डे शोधणारे अॅप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2018 07:18 AM2018-12-16T07:18:06+5:302018-12-16T07:19:20+5:30
टेकफेस्ट : मुंबईत प्रयोग होण्याची शक्यता
मुंबई : महाराष्ट्रातील रस्त्यांवर खड्डे दाखवा बक्षीस मिळवा, अशी घोषणा झाली असली तरी प्रत्यक्षात कोणत्याही शहरात वाहनचालकाची खड्ड्यांतून मुक्ती झालेली नाही. प्रशासनाला हे खड्डे दिसत नसतील, तर आता त्याचा अॅलर्ट डायरेक्ट तुम्हीही देऊ शकणार आहात. मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी तसे अॅप तयार केले असून, ते अॅप रस्त्यावरील खड्डेच शोधून काढणार आहे.
आयआयटीच्या सेंटर आॅफ स्टडिज इन रिसोर्स इंजिनीअरिंग या डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेले हे अॅप टेकफेस्टमध्ये सादर करण्यात आले आहे. अॅपमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला खड्डे आॅन द स्पॉट दाखवणे सोपे होईल. शिवाय कुठे खड्डा आहे ते देखील शोधता येईल. खड्ड्यांची तीव्रता, खोलीही मोजता येईल, अशी माहिती हे अभिषेक पोतनीस या विद्यार्थ्याने दिली.
अॅप पूर्णत: तयार असले तरी ते मुंबईकरांना वापरासाठी देण्यापूर्वी आयआयटीच्या या टीमला पालिकेच्या परवानगीची आवश्यकता आहे. या अॅपसंदर्भात प्राध्यापक सूर्य दुर्भा आणि विद्यार्थ्यांची पालिका आयुक्त अजॉय मेहता यांच्यासोबत बैठक झाली असून पुढील कार्यवाही लवकरच होईल, अशी अपेक्षा प्रा. दुर्भा यांनी व्यक्त केली.
मुंबईकरांची सोय
च्मोबाइलमध्ये अॅप डाउनलोड करून आॅटोमोडमध्ये टाकल्यास आणि गाडीतून जाताना रस्त्यात खड्डा लागल्याने गाडीला हिसका बसल्यास, आपोआप या अॅपच्या इंटरफेसवरून तो खड्डा सर्व्हरवर रिपोर्ट केला जाईल.
च्मोबाइलच्या सेन्सरमधील एक्झिलोरोमीटरच्या साहाय्याने हे खड्डे आपोआप दिसतील.
च्पालिका प्रशासनासाठीही वेब पेज इंटरफेस तयार करण्यात आले आहे. मुंबईकरांनी डिटेक्ट किंवा रिपोर्ट केलेले खड्डे यावर लाल ठिपक्यांत दिसतील.
च्हे खड्डे बुजविण्यासाठीची निविदा निघाल्यानंतर आणि ते बुजल्यानंतर पालिका प्रशासन ते डिलिट करू शकतील.
आयआयटीचे विद्यार्थी केवळ हे अॅप बनवून स्वस्थ बसले नसून ते अद्ययावत करण्याकडेही त्यांनी आता लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर ते एक हार्डवेअर युनिट तयार करत आहेत.
गाडीच्या पाठीमागे ते बसवल्यावर त्याच्या माध्यमातून गाडी जेथून जाईल तेथील रस्ता स्कॅन होईल आणि खड्डे आपोआप दिसतील. मात्र, या संकल्पनेवर बरेच काम करणे बाकी असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.