बाप्पाच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2016 05:23 AM2016-08-29T05:23:58+5:302016-08-29T05:23:58+5:30
गणेश चतुर्थीला अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, रविवारी मोठ्या संख्येने मुंबापुरीतील गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त साधला.
मुंबई : गणेश चतुर्थीला अवघा आठवडा शिल्लक राहिला असून, रविवारी मोठ्या संख्येने मुंबापुरीतील गणेशोत्सव मंडळांनी बाप्पाच्या आगमनाचा मुहूर्त साधला. मात्र आगमनावेळी रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांना तारेवरची कसरत करावी लागली. दरम्यान, वरुण राजाने दिलेल्या जोरदार सलामीमुळे वाहतुकीचा वेगही मंदावला होता.
गिरगाव आणि गिरणगावासह पूर्व व पश्चिम उपनगरांतील बहुतेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रविवारच्या सुट्टीचा मुहूर्त साधत बाप्पाचा आगमन सोहळा पार पाडला. ढोल-ताशाच्या तालावर गणपतीच्या मूर्ती कार्यशाळेतून मंडळाकडे कूच करत होत्या. मात्र परळ, करीरोड, लालबाग, चिंचपोकळी, ना.म. जोशी मार्ग या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे मंडळांची त्रेधातिरपिट उडाली. रस्त्यांवरील खड्ड्यांतून बाहेर पडलेली खडी आणि उखडलेल्या पेव्हर ब्लॉकमुळे ट्रॉली खेचताना कार्यकर्त्यांच्या तोंडातून फेस निघाला.
गेल्या आठवड्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे विशेषत: चिंचपोकळी उड्डाणपूल आणि करी रोड उड्डाणपुलावर भलेमोठे खड्डे पडले आहेत. हीच परिस्थिती भायखळा ते भारतामाता उड्डाणपुलावर पाहायला मिळाली. (प्रतिनिधी)
रविवारच्या मुहूर्तावर बहुतेक मंडळांच्या गणेशमूर्तींचा आगमन सोहळा मोठ्या धूमधडाक्यात पार पडला. यामध्ये अभ्युदयनगरचा राजा, गणेशनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, संत गाडगे महाराज चौक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, प्रगती सेवा मंडळ, मुंबादेवीचा राजा, पानबाजारचा राजा, कुलाब्याचा लाडका, रामनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, अभ्युदयनगरचा गणराज, साकिनाक्याचा राजा, पायलेट बंदरचा राजा, ना.म. जोशी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, फोर्टचा राजा, ग्रँटरोडचा राजा, काळेवाडीचा विघ्नहर्ता या बाप्पांच्या मूर्तींचा समावेश होता.
लालबाग परिसरातील वाहतुकीला ब्रेक
खड्डे चुकवत बाप्पांची स्वारी निघाल्याने रस्त्यावरील वाहतुकीलाही ब्रेक लागला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील उड्डाणपुलावर आणि उड्डाणपुलाखाली वाहतूक मंद गतीने सुरू होती. तर चिंचपोकळी आणि करी रोड उड्डाणपुलांवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दोन्ही उड्डाणपुलांवर वाहतूककोंडी झाल्याने लालबाग परिसरातील वाहतुकीला ब्रेक लागला.