मुंबई : भाच्याच्या लग्नासाठी रत्नागिरीच्या माधवी पांडुरंग काणसे (४८) या मुंबईला आल्या होत्या. लग्नसमारंभ उरकून त्या गावाकडे निघाल्या. निघताना मुंबईतील सोनसाखळी चोरांपासून दागिने वाचविण्यासाठी त्यांनी ते पाकिटात लपवून ठेवले. मात्र घाटकोपर ते माटुंगादरम्यान रेल्वे प्रवासात पाकीटमाराने त्यांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेमुळे काणसे कुटुंबीयांना धक्काच बसला. यामध्ये त्यांचे साडे तीन तोळ्यांचे दागिने चोरीला गेले. या प्रकरणी माटुंगा पोलिसांनी अनोळखी पाकीटमाराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मूळच्या रत्नागिरीच्या गावराई येथील रहिवासी असलेल्या काणसे यांनी १८ एप्रिलला भाच्याच्या लग्नासाठी मुंबई गाठली. घाटकोपर येथे लग्नसमारंभ उरकल्यानंतर १९ तारखेला सायंकाळच्या सुमारास माटुंग्यातील नातेवाइकांकडे निघाल्या. चोरांपासून सावधानता म्हणून लग्नमंडपातून निघताना त्यांनी गळ्यातील मंगळसूत्र, हार असे साडेतीन तोळ्यांचे दागिने पाकिटात लपवून ठेवले.घाटकोपर येथून लोकलने त्या माटुंग्याच्या घरी आल्या. घरी आल्यावर पाकीट तपासले असता, पाकीट खालून ब्लेडने फाटलेले दिसले. पाकिटातील दागिनेही गायब झाल्याने त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी या प्रकरणी शुक्रवारी माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. माटुंगा पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
लपवलेल्या दागिन्यांवर पाकीटमाराचा डल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 2:51 AM