Join us

कोरोना प्रतिबंधक लसी आणि औषधे पेटंटमुक्त करा - स्वदेशी जागरण मंचचे अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 02, 2021 4:07 AM

स्वदेशी जागरण मंचचे अभियानलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोनाला अटकाव करणाऱ्या लसी ...

स्वदेशी जागरण मंचचे अभियान

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या संसर्गाने संपूर्ण जग त्रस्त आहे. कोरोनाला अटकाव करणाऱ्या लसी आणि औषधांवर बड्या जागतिक कंपन्यांचे स्वामित्व हक्क (पेटंट) असल्याने त्या जगभरात सहज उपलब्ध होत नाहीत. कंपन्यांच्या नफेखोरीसाठी जगभरातील लोकांचा जीव धोक्यात टाकता येणार नाही. त्यामुळे लसी आणि औषधे पेटंटमुक्त करण्यासाठी स्वदेशी जागरण मंचने अभियान सुरू केले आहे.

स्वदेशी जागरण मंचचे कोकण संयोजक प्रशांत देशपांडे यांनी या जागतिक अभियानाची माहिती दिली. इस्रायल, अमेरिका, इंग्लंड अशा सहा देशांमध्ये प्रौढ लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण झाल्याने तिथले संकट जवळपास संपले आहे. त्यामुळे भारतासह जगभरातील ६०० कोटी प्रौढ लोकसंख्येचे आता लसीकरण करणे आवश्यक आहे. कोरोनावरील लसी आणि औषधे पेटंटमुक्त करून उत्पादन वाढविण्यासाठी देशव्यापी जनजागरण अभियान सुरू करण्यात आले आहे. युनिव्हर्सल ॲक्सेस टू व्हॅक्सिन्स ॲन्ड मेडिसिन्स अर्थात ‘युवम’ या नावाने हे अभियान सुरू आहे. त्यामध्ये ऑनलाईन स्वाक्षरी अभियानाबरोबरच वेबिनार, प्रदर्शन, संपर्क प्रचार अशा गोष्टी सुरू असल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

वैश्विक लसीकरण आणि औषध अभियानांतर्गत देशातील तसेच विदेशातील विविध सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व प्रकारच्या संघटना, संस्था, विचारवंत, न्यायाधीशांचे सहकार्य घेतले जात आहे. भारत सरकारने दक्षिण अफ्रिकेच्या बरोबर लसी आणि औषधे स्वामित्वमुक्त करण्याचा आणि ट्रिप्स करारातून सवलत देण्याचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेकडे (डब्लूटीओ) ठेवला आहे. त्याला आतापर्यंत १२० देशांनी पाठिंबा दर्शविलेला आहे. प्रस्तावाला विरोध करणारे देश, कंपन्या, व्यक्ती आणि गटांनी माणुसकीच्या हितासाठी त्वरित हा विरोध थांबवावा, अशी मागणीही जागरण मंचाने केली.

आतापर्यंत डिजिटल हस्ताक्षर अभियानात चार लाख नागरिकांनी स्वाक्षरी केली. अशाच दुसऱ्या याचिकेवर भारत आणि जगातील २० देशांमधील १६०० हून अधिक शिक्षण क्षेत्रातील नामवंत, विचारवंतांनी स्वाक्षरी करून पेटंटमध्ये सवलत, तंत्रज्ञान हस्तांतरणाची मागणी केली. कोरोनाविरोधात लसी, औषधांची जगभर उपलब्धता होण्यासाठी सर्व नागरिकांनी, संबंधित व्यक्ती, संघटनांनी या कामात सहभागी होण्याचे आवाहन केल्याचे देशपांडे यांनी सांगितले.

..................................