संदीप शिंदे ।
मुंबई : पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या (पीपीपी) माध्यमातून कांजूरमार्ग ते बदलापूर (मेट्रो १४) ही मार्गिका उभारण्याचा निर्णय अंतिम झाला असून त्याची व्यवहार्यता तपासण्यासाठी ट्रान्झॅक्शन अॅडव्हायजरी नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत. मुंबई-नवी मुंबई एअरपोर्ट मार्गिकेसाठी (मेट्रो ८) हीच पद्धत स्वीकारली जाईल. मात्र, पीपीपी तत्त्वावरील वर्साेवा-अंधेरी- घाटकोपर (मेट्रो एक)चा अनुभव कटू असून ही मेट्रो दररोज एक कोटींचा तोटा सोसत असल्याचा कंपनीचा दावा आहे. आर्थिक मंदीच्या काळात नव्या मेट्रो मार्गिकांसाठी खासगी कंपन्या पुढाकार घेतील का, असा प्रश्न आहे.
२०२६ पर्यंत मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विस्तारण्याचा एमएमआरडीएचा आराखडा आहे. त्यापैकी ११.१ किमी लांबीची मेट्रो एक ही एकमेव मार्गिका पीपीपी मॉडेलनुसार आहे. या प्रकल्पाची कंत्राटदार कंपनी आणि एमएमआरडीए यांच्यातील आर्थिक वाद न्यायालयापर्यंत गेले. तिकीट दर जास्त असूनही दररोज एक कोटींचा तोटा होतो, असे सांगत कंपनीकडून दरवाढीसाठी तगादा लावला जातो. त्यामुळे एमएमआरडीएने पीपीपीऐवजी मेट्रो प्रकल्पांसाठी आपल्या तिजोरीचे दरवाजे खुले केले. परंतु नव्या मेट्रो मार्गांसाठी निधी उभारणी अवघड आहे. शिवाय सर्व प्रकल्पांसाठी पीपीपी मॉडेल स्वीकारले तरच केंद्राकडून अनुदान मिळेल अशी अट आहे. त्यामुळे हा पर्याय स्वीकारल्याचे सांगण्यात येते. कांजूरमार्ग-बदलापूर ही ४४.७ किमी लांबीची मार्गिका असून ती सुरू झाल्यानंतर प्रति दिन १० लाख प्रवासी प्रवास करतील असा अंदाज आहे.पीपीपी यशस्वी करण्याचे आव्हानमेट्रो मॅन ई. श्रीधरन यांनीही वेळेवेळी पीपीपी मॉडेलविरोधात भूमिका मांडली आहे. त्यामुळे हे मॉडेल यशस्वी करण्याचे आव्हान एमएमआरडीएपुढे असेल, असे मत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले. खासगी कंपनीला तिकिटातून मिळणारा महसूल हे एकमेव उत्पन्नाचे साधन न ठेवता हैदराबादच्या धर्तीवर पर्यायी मार्गाने रसद पुरविण्यासारख्या प्रयत्नांचा अवलंब केल्यास मार्ग काही प्रमाणात सुकर होऊ शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले. याबाबत महानगर आयुक्त आर. ए. राजीव आणि सहआयुक्त बी. जी. पवार यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.पीपीपी मॉडेल यशस्वी करणारसध्या पायाभूत सुविधांची को्यवधी रुपये खर्चाची कामे सुरू आहेत. भविष्यातील कामासाठी पर्यायी स्तोत्र निर्माण करणे गरजेचे असल्याने पीपीपीचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. मेट्रो एकचे काम पूर्णपणे डीएमआरसीच्या मार्गदर्शनाखाली झाली होती. त्यात काही त्रुटी राहिल्या असतील. परंतु, एमएमआरडीएने त्यानंतर मेट्रोची जी कामे केली आहेत त्यातून सर्व आघाड्यांवरील अनुभव समृद्ध झाला आहे. त्यामुळे हे पीपीपीचे मॉडेल नक्की यशस्वी करू. - आर. ए. राजीव, महानगर आयुक्त