पिंजाळ जलप्रकल्पाचा मार्ग मोकळा, पाणीपुरवठा ८६५ दशलक्ष लीटरने वाढणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2020 12:55 AM2020-01-08T00:55:08+5:302020-01-08T00:55:15+5:30
गारगाई धरणाच्या मार्गात बाधित गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार झाल्यानंतर आता पिंजाळ धरण प्रकल्पाचा मार्गही मोकळा झाला आहे.
मुंबई : गारगाई धरणाच्या मार्गात बाधित गावांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार झाल्यानंतर आता पिंजाळ धरण प्रकल्पाचा मार्गही मोकळा झाला आहे. या जल प्रकल्पामुळे मुंबईचा पाणीपुरवठा दररोज ८६५ दशलक्ष लीटरने वाढणार आहे़ या प्रकल्पाची प्राथमिक अभियांत्रिकी कामे व शासनाच्या आवश्यक परवानग्या मिळविण्यासाठी सल्लागार नेमण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंगळवारी पालिका महासभेत मंजुरी देण्यात आली़
सात धरणांमधून मुंबईला दररोज ३९५८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र लोकसंख्या वाढत असल्याने मुंबईची तहानही वाढत चालली आहे़ त्यानुसार राज्य शासनाच्या डॉ. एम. ए. चितळे समितीच्या शिफारशींनुसार गारगाई, पिंजाळ आणि दमणगंगा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याचे धोरण पालिकेने आखले आहे़ यापैकी गारगाई प्रकल्पाचा अहवाल प्राप्त होऊन संबंधित कामाची अभियांत्रिकी कामे सुरू आहेत. त्यापाठोपाठ आता पिंजाळ प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे बाधित २०५५ हेक्टर क्षेत्रापैकी १० कि़मी़ परिक्षेत्र तानसा वन्यजीव अभयारण्य परिक्षेत्रात, तर प्रकल्पामुळे ११३०.८२ हेक्टर वनजमीनही बाधित होणार आहे.
त्यामुळे प्रकल्पासाठी वन व पर्यावरण मंत्रालय, राष्ट्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळविणे, केंद्रीय जल आयोग, जलसंधारण मंत्रालय यांच्याकडून आवश्यक परवानग्या मिळविण्याची कार्यवाही करण्याचे काम सल्लागाराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. या प्रस्तावाला पालिकेच्या महासभेत मंगळवारी मंजुरी देण्यात आली़
मुंबईला दररोज ३,९५८ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो़ यापैकी २० टक्के म्हणजे सरासरी ९०० दशलक्ष लीटर पाणी गळती व चोरीमध्ये वाया जात आहे़ तानसा, मोडक सागर, विहार, तुळशी, अप्पर वैतरणा, भातसा या धरणांतून गेल्या काही वर्षांपासून पाणीपुरवठा केला जात आहे़ २०१२ मध्ये मध्य वैतरणा धरण तयार झाले़ यामुळे मुंबईचा पाणीपुरवठा दररोज ४५५ दशलक्ष लीटरने वाढला़ गारगाई प्रकल्पातून - ४४०, पिंजाळ - ८६५,
दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प - १५८६ = ३८०१ दशलक्ष लीटर पाणीपुरवठ्यात वाढ होणे अपेक्षित आहे.