Join us

अमरशेख अध्यासनात पठ्ठे बापुराव कलादालन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 4:40 AM

मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनात लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालन उभारण्यासाठी शासन सर्व सहकार्य करील

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीअंतर्गत असलेल्या शाहीर अमरशेख अध्यासनात लोकशाहीर पठ्ठे बापुराव कलादालन उभारण्यासाठी शासन सर्व सहकार्य करील, तसेच लोककला अकादमी अनुदानावर घेण्याचा प्रलंबित प्रश्नही सोडविण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी परंपरा महोत्सवाचे उद्घाटन करताना दिले. या परंपरा महोत्सव समारंभाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर होते तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रख्यात गायिका ईला अरुण उपस्थित होत्या.विद्यापीठाची लोककला अकादमी, शाहीर अरमशेख अध्यासन, पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, उदयपूर, दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर, साहित्य अकादमी, भारत सरकार, डॉ. रा. चिं. ढेरे संस्कृती संशोधन केंद्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा भवन विद्यानगरी, कलिना येथे २२, २३ डिसेंबर रोजी परंपरा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमीच्या सहकार्याने पश्चिम भारतीय आदिवासी साहित्यावर राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यंदाचा परंपरा महोत्सव आदिवासी लोकनृत्य, संगीताला वाहिलेले होता. राजस्थान, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यांतील सुमारे २०० आदिवासी कलावंत या महोत्सवात सहभागी झाले होते तर आदिवासी साहित्यावरील राष्ट्रीय चर्चासत्रात एकूण २५ अभ्यासक सहभागी झाले होते. चर्चासत्राचे उद्घाटन ९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांनी केले, तर अध्यक्षस्थानी साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष माधव कौशिक हे होते.परंपरा महोत्सवात स्वागतपर भाषण अकादमीचे प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी केले, तर प्रास्ताविक शाहीर अध्यासनाचे प्रमुख प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांनी केले. महाराष्ट्रातील बोहाडा, सोंगी नाच, इतर राज्यातील गैर नृत्य, थपेट गुलु, ढोलू कुनीथा, राठवा नृत्य, चक्री नृत्य असे कलाप्रकार २२ - २३ डिसेंबर दोन दिवस चाललेल्या या परंपरा महोत्सवात सादर झाले. निवेदन मदन दुबे यांनी केले. साहित्य अकादमीचे विभागीय सचिव कृष्णा किंबहुने यांनी राष्ट्रीय चर्चासत्रात मोलाचे मार्गदर्शन केले.

टॅग्स :मुंबई