पतीला २० हजारांचा दंड; पत्नीच्या मानसिक आरोग्य चाचणीची केली होती मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 02:29 AM2018-02-11T02:29:48+5:302018-02-11T02:29:56+5:30
पत्नी मानसिक रुग्ण आहे, असा आरोप करत तिच्या मानसिक आरोग्याची चाचणी करण्याची मागणी करणाºया पतीला उच्च न्यायालयाने नुकताच २० हजारांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम चार आठवड्यांत पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला.
मुंबई : पत्नी मानसिक रुग्ण आहे, असा आरोप करत तिच्या मानसिक आरोग्याची चाचणी करण्याची मागणी करणाºया पतीला उच्च न्यायालयाने नुकताच २० हजारांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम चार आठवड्यांत पत्नीला देण्याचा आदेश न्यायालयाने पतीला दिला.
पत्नीचा छळ करण्याचा हा प्रयत्न आहे. कायद्याचाही गैरवापर करण्यात येत आहे, असे न्या. गिरीश कुलकर्णी यांनी पतीने केलेली याचिका फेटाळताना म्हटले. याचिकाकर्त्याने (पती) पत्नीची मानसिक, जैविक व अन्य काही चाचण्या करण्याची मागणी केली. मात्र त्याला नक्की काय म्हणायचे आहे, हे तो सांगू शकला नाही. याचिकाकर्ता पत्नीपासून दूर पळण्याचा प्रयत्न करत आहे. त्यासाठी त्याने घटस्फोट याचिका दाखल केली आणि त्यानंतर तिच्या विविध चाचण्यांची मागणी करणारा अर्ज केला. या अर्जाद्वारे तो पत्नीची छळणूक करत आहे. त्याने ही याचिका घटस्फोट याचिका दाखल केल्यानंतर दोन वर्षांनी विचारपूर्वक केली, हे कुटुंब न्यायालयाचे निरीक्षण योग्य आहे, असे न्या. कुलकर्णी म्हणाले. तसेच याचिका फेटाळत त्याला २० हजारांचा दंड ठोठावला.
२०१५ मध्ये अर्ज
पत्नीला मानसिक आजार असल्याचे सांगत २०१५ मध्ये याचिकाकर्त्याने कुटुंब न्यायालयात घटस्फोट अर्ज दाखल केला होता. मात्र, कुटुंब न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला.