मुंबई : प्रसिद्ध केईएम रुग्णालयाच्या बाह्य रुग्ण विभागातील साधारण ५० ते ६० रुग्णांची रवानगी चक्क हिंदमाता येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि रुग्णालयावरील भार कमी करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून या पुलाखाली तात्पुरती व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या प्रकारावर समाजमाध्यमातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत आहे. त्यामुळे रुग्णालयांवरील ताणही वाढला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील गर्दी कमी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची हिंदमाता पुलाखाली पाठवणी करण्यात आली. केईएममधील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसह टाटा कँसर रुग्णालयात उपचारांसाठी फेऱ्या घालणारे काही रुग्णसुद्धा या ठिकाणी आहेत. कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे रुग्णालयांवरील ताण वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर रुग्णालय सील केल्याने अन्य रुग्णांच्या समस्या वाढत असल्याची तक्रार स्थानिक भाजप नेत्यांनी केली आहे.याबाबतचे वृत्त पसरताच समाजमाध्यमांतून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अशा प्रकारे रुग्णांची हेळसांड योग्य नाही. किमान शाळा, महाविद्यालयांमध्ये या रुग्णांची व्यवस्था व्हायला हवी होती, असा सूर उमटत आहे. सोशल मीडियावरून संताप व्यक्त होत असला तरी रुग्ण आणि नातेवाइकांकडून तक्रार केली गेली नाही. संचारबंदीमुळे रुग्णालय परिसरातच अडकून पडावे लागले होते. तेव्हा पालिका आणि भोईवाडा पोलिसांनी इथे तात्पुरती व्यवस्था करून दिली. रुग्णालयाच्या आवारात पडून राहण्यापेक्षा इथे किमान आडोसा आणि सोयी आहेत. शिवाय, दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था झाल्याची माहिती काही रुग्णांच्या नातेवाइकांनी दिली.