Join us

ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलच्या चुकीमुळे रुग्णाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2018 4:12 PM

महिला व बाल हक्क आणि विकास समितीच्या दौऱ्यावेळी प्रकार उघडकीस

मुंबई : अंधेरी पश्चिम येथील ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरमधील (बीएसएस एमजी) डॉक्टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारांमुळे मंदार वेलणकर (४२) यांचा हकनाक मृत्यू झाला. त्यांची पत्नी मीनाक्षी वेलणकर यांनी हॉस्पिटलकडे डॉक्टर आणि नर्सिंग स्टाफच्या अनेक तक्रारी केल्या होत्या. मात्र हॉस्पिटल प्रशासनाने याप्रकरणी कुठल्याच प्रकारचा तपास आणि कारवाई केली नाही. याप्रकरणी मीनाक्षी वेलणकर यांनी अखेर ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलच्या हलगर्जीपणाबद्दल शासनाच्या महिला व बाल हक्क आणि विकास समितीच्या अध्यक्षा व आमदार डॉ. भारती लव्हेकर यांच्याशी संपर्क साधून लेखी तक्रार केली होती.ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या डॉक्टर आणि हॉस्पिटल प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी आमदार डॉ. लव्हेकर यांच्याकडे केली. महिला व बाल हक्क आणि विकास समितीने नुकतीच बीएसईएस हॉस्पिटलला भेट देऊन याप्रकरणी येथील व्यवस्थापनाला धारेवर धरले. याप्रकरणी डॉक्टर, हॉस्पिटल नर्सिंग स्टाफ आणि हॉस्पिटल प्रशासनाची सखोल चौकशी करून कडक कारवाई करण्याचे आदेश डॉ.लव्हेकर यांनी दिले आहेत.कांदिवलीत राहणा-या मंदार वेलणकर यांना सर्व्हीकल स्पॉन्डयलायटिसचा त्रास होता. ४ नोव्हेंबर २०१७ रोजी पाठीच्या दुखण्याची तक्रार घेऊन वेलणकर दाम्पत्य बीएसईएस हॉस्पिटल येथे उपचारांसाठी आले होते. त्यांना २५ ऑक्टोबर २०१७ रोजी ब्रह्मकुमारी ग्लोबल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. "मंदार वेलणकर यांच्यावर हॉस्पिटलमधील डॉ. शशांक जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली बीएसईएसमध्ये उपचार होत होते. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करावी लागेल, असे डॉ. जोशी यांच्याकडून सांगण्यात आले. मात्र शस्त्रक्रियेनंतर वेलणकर यांच्या शरीराचा डावा भाग अर्धांगवायूनं अधू झाला. याबद्दल डॉ. शशांक जोशी यांच्याकडे विचारणा केली, मात्र त्यांनी कुठलेही समाधानकारक उत्तर दिले नाही," अशी माहिती मीनाक्षी वेलणकर यांनी दिली. सलग ३ दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यानंतर डॉ. शशांक जोशी यांनी मंदार वेलणकर  यांच्या डोक्याची कवटी काढावी लागेल असा अघोरी सल्ला दिला. "शस्त्रक्रियेद्वारे मंदार यांच्या डोक्याची कवटी काढण्यात आली. ३ दिवस मंदार यांना बँडेज लावून ठेवण्यात आले होते, मात्र कुटुंबियांपैकी कोणालाच नर्सिंग स्टाफने मंदार वेलणकर त्यांच्याजवळ फिरकू दिले नाही ” अशी तक्रार मीनाक्षी वेलणकर यांनी समिती अध्यक्षा डॉ. लव्हेकर यांच्याकडे  केली होती. 

मंदार वेलणकर यांच्या मृत्यू प्रकरणी बीएसइएस हॉस्पिटल चे संचालक डॉ.अशोक मेहता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, जेव्हा मंदार वेलणकर यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, त्यावेळी त्यांची प्रकृती खूप चिंताजनकच होती. त्यांच्या मेंदूत गाठ असल्यामुळे तातडीने शत्रक्रिया करावी लागली होती. त्यांच्या मृत्यशी हॉस्पिटलचे डॉ. शशांक जोशी, नर्सेस आणि स्टाफ यांचा काहीही संबंध नाही. माधुरी वेलणकर यांचे सदर आरोप खोटे आहेत. 

टॅग्स :हॉस्पिटलमृत्यूमुंबई