Join us

बनावट इंजेक्शनमुळे ‘सैफी’त रुग्णाचा मृत्यू; एफडीएच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2023 6:09 AM

मुंबईतील सैफी रुग्णालयात रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता (ॲनेमिया) झाल्याने विवेक कांबळी यांच्यावर उपचार सुरू होते.

मुंबई : रक्तातील तांबड्या पेशी कमी झाल्याने मुंबईतील सैफी रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णाचा बनावट इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचे एफडीएच्या चौकशीत स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, एफडीएच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून व्ही. पी. रोड पोलिसांनी मुंबईतील सैफी रुग्णालयातील मेडिकलसह  ठाणे, पुणे, औरंगाबाद तसेच दिल्लीतील ११ फार्मा सेंटर, पुरवठादारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

मुंबईतील सैफी रुग्णालयात रक्तातील तांबड्या पेशींची कमतरता (ॲनेमिया) झाल्याने विवेक कांबळी यांच्यावर उपचार सुरू होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला ओरोफर हे इंजेक्शन दिले. मात्र, या इंजेक्शनचा दुष्परिणाम होऊन रुग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणी रुग्णाच्या नातेवाइकांनी एफडीएकडे तक्रार केली. तक्रारीची दखल घेत एफडीएने तातडीने रुग्णालयावर कारवाई केली. ही कारवाई १० ते ११ नोव्हेंबरदरम्यान करण्यात आली. या कारवाईमध्ये एफडीएने रुग्णालयातील ओरोफर इंजेक्शनचा साठ्याची पाहणी केली. त्यानंतर रुग्णालयामध्ये उपलब्ध असलेला या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आला. तसेच जप्त केलेल्या इंजेक्शनचे काही नमुने एफडीएने तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविले होते. 

त्याच्याच अहवालात ते एफसीएम इंजेक्शन, बॅच नं. इ. एल. एफ. ८ बी. बी. २००१ हे बनावट व अप्रमाणित असल्याचे निष्पन्न झाले. यामध्ये बनावट लेबल, पत्रकाचा वापर करून फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. एफडीएचे औषध निरीक्षक राजेश बाबूराव बनकर (वय ४८) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चर्नी रोड येथील सैफी रुग्णालयातील मेडिकल स्टोअरमधून सुरू झालेल्या इंजेक्शनचा प्रवास मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद तसेच दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. त्यानुसार, या भागातील ११ मेडिकल, पुरवठादारांविरोधात फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तपास सुरू 

गुन्हा दाखल केल्याच्या वृत्ताला व्ही. पी. रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर कुमार शिंदे यांनी दुजोरा देत, अधिक तपास सुरू असल्याचे नमूद केले आहे. 

टॅग्स :हॉस्पिटलमृत्यूपोलिस