Join us

रुग्ण ‘बेहाल’ !

By admin | Published: March 24, 2017 1:29 AM

डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे मुंबईसह राज्यभरातील रुग्णसेवा ‘बेहाल’ झाली आहे.

मुंबई : डॉक्टरांवर सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांच्या निषेधार्थ गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संपामुळे मुंबईसह राज्यभरातील रुग्णसेवा ‘बेहाल’ झाली आहे. परिणामी, सरकारी आरोग्य यंत्रणेचा डोलारा पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला आहे. खासगी आणि निवासी डॉक्टरांनी हा दणका दिल्याने रुग्णांचे अतोनात हाल सुरू आहेत. बाह्यरुग्ण विभाग, अपघात विभागासह आंतररुग्ण, शस्त्रक्रिया विभागांना संपाचा जोरदार फटका बसला आहे. तर अत्यावश्यक सेवा वगळता रुग्णालयातल्या बहुतांश विभागांना संपाचा फटका बसला आहे.मुंबई शहर-उपनगरातील केईएम, शीव, नायर, जे.जे. अशा प्रमुख रुग्णालयांमधील बाह्यरुग्ण कक्ष गुरुवारी बंद होते. त्यामुळे या रुग्णालयांमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा होत्या. मात्र मागच्या काही दिवसांच्या तुलनेत रुग्णालय आवारात शस्त्रधारी पोलीस तैनात आहेत. शिवाय, रुग्णांच्या नातेवाइकांनाही प्रवेश पास बाळगणे सक्तीचे करत असल्याचे चित्र आहे. तर प्रमुख रुग्णालयांमध्ये बाह्य रुग्ण विभाग बंद असल्याने विरार, नागपूर, लातूर, रत्नागिरी अशा दूरच्या ठिकाणांहून दाखल झालेल्या रुग्णांना माघारी जावे लागले. सरकारी आरोग्य सेवेत निवासी डॉक्टरांना पाठीचा कणा म्हटले जाते. अशा वेळी निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजा आंदोलनात इंडियन मेडिकल असोसिएशन, दिल्ली रेसिडंट डॉक्टर असोसिएशन, फार्मासिस्ट असोसिएशन आणि रेडिओलॉजिस्ट अशा अनेक संघटनांनीही संपात सहभाग घेतला. तर निवासी डॉक्टरांचा दैनंदिन शस्त्रक्रियांमध्ये सर्वांत मोठा हातभार असतो. तेच निवासी वैद्यकीय अधिकारी संपावर गेल्याने बहुतांश शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या. (प्रतिनिधी)